‘यूटीएस ऑन मोबाइल’चा वापर करून घरबसल्या काढा रेल्वेचे तिकिट
By नरेश डोंगरे | Published: July 21, 2023 08:14 PM2023-07-21T20:14:57+5:302023-07-21T20:15:25+5:30
तिकिट प्रक्रिया गतीशिल आणि कॅशलेस करण्याचे प्रयत्न : तिकिटसाठी लाईनमध्ये लागण्याची गरज नाही : दपूम रेल्वेकडून स्थानकावर प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे स्थानकावर तिकिट काढण्यासाठी लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा त्रास वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यूटीएस ऑन मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपवरून तिकिट कसे काढायचे, बुकिंग सोबत रिझर्वेशन कसे करायचे, त्याची प्रवाशांना माहिती देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकावर प्रशिक्षण स्टॉल लावले आहेत.
रेल्वे तिकिट काढण्याचा प्रकार म्हणजे कसरत करण्यासारखाच असतो. रेल्वे स्थानकावर जाऊन लांबच लांब रांगात तिष्ठत राहावे लागते. नंबर आल्यानंतर तिकिटाचे सुटे पैसे नसले तर पुन्हा त्रास. बाहेर जाऊन चिल्लर करून आणा आणि नंतर तिकिट घ्या. अनेकदा तांत्रिक बिघाडही होतो आणि हा प्रकार प्रचंड हा ताप देणारा ठरतो. अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे आपण प्रवासाला निघतो आणि ट्रॅफिक जाम अथवा अशाच कोणत्या कारणामुळे गाडी सुटण्याची वेळ येत असताना रेल्वे स्थानकावर पोहचतो. अशा वेळी पुन्हा तिकिट काउंटरसमोर जाऊन तिकिट काढतो म्हटले तर गाडी सुटण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी आणि तिकिट देण्या-घेण्याची प्रक्रिया गतीशिल आणि कॅशलेस करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘यूटीएस ऑन मोबाइल’ आणले आहे.
या अॅपच्या माध्यमातून आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवरच तिकिट काढता येते. जास्तीत जास्त प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमध्यहे हे अॅप डाऊनलोड करावे म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकावर प्रशिक्षण कॅम्प (स्टॉल) लावले आहे. रेल्वेचे कर्मचारी संबंधित प्रवाशांना हे अॅप कसे डाऊनलोड करायचे, कसे वापरायचे, त्याबाबत माहिती देत आहेत. काही अडचणी त्रुटी आल्या तर त्यासुद्धा कशा दूर करायच्या, त्या संबंधाने प्रवाशांना मार्गदर्शन करीत आहेत.
२० किलोमीटरवरूनही होऊ शकते बुकिंग
प्रारंभी रेल्वे स्थानकापासून ५ किलोमिटर अंतराच्या क्षेत्रात हे अॅप काम करीत होते. आता मात्र रेल्वेस्थानकापासून २० किलोमिटर दूर राहूनही या अॅपच्या माध्यमातून रेल्वेचे तिकिट प्रवासी काढू शकतात. आधीच काढलेले सिझन तिकिट आणि नुतनीकरणही करू शकतात. शिवाय प्लॅटफॉर्म तिकिटही मोबाईलवरूनच प्रवासी घेऊ शकतात.