जैविक कचरा खरेदी करणाऱ्याला पकडले

By admin | Published: May 17, 2017 01:59 AM2017-05-17T01:59:31+5:302017-05-17T01:59:31+5:30

मेडिकलमधून निघणारा रोजचा जैविक कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) तीन हजार रुपयात विकत घेऊन भंगारात विकणाऱ्या

The buyer of a biological garbage caught | जैविक कचरा खरेदी करणाऱ्याला पकडले

जैविक कचरा खरेदी करणाऱ्याला पकडले

Next

रोजची उलाढाल तीन हजार रुपयांची : मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमधून निघणारा रोजचा जैविक कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) तीन हजार रुपयात विकत घेऊन भंगारात विकणाऱ्या एका इसमाला मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून अजनी पोलीस ठाण्याच्या हवाली केले, विशेष म्हणजे, जैविक कचऱ्याची विक्री करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’चे कर्मचारी निघाल्याने खळबळ उडाली आहे.
‘लोकमत’ने १६ मेच्या अंकात ‘मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची गंभीर दखल मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक विभागाने घेतली. मंगळवारी सकाळपासून जैविक कचऱ्याच्या संकलनावर विशेष पाळत ठेवून विक्री आणि खरेदी करणाऱ्यांनाच ताब्यात घेतले.
रुग्णाशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू ‘बायो-मेडिकल वेस्ट’ (जैविक कचरा) मध्ये मोडते. हा घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याचा नियम आहे. सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ‘बायो मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’ अर्थात जैविक वैद्यकीय कचरा हाताळणी नियमावली आहे. मेडिकलमधून निघणाऱ्या रोजच्या जैविक कचऱ्याच्या विघटनाचे कंत्राट ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ला देण्यात आले आहे. परंतु हा कचरा विघटनला जाण्यापूर्वीच भंगार विक्रेत्यांकडे पोहचत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. वृत्ताची दखल मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक विभागातील चमूने घेतली. एक डॉक्टर व दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सकाळपासून जैविक कचऱ्याच्या संकलनावर पाळत ठेवली.
हा कचरा हाताळणारे ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’चे दोन कर्मचारी ‘आकाश’ नावाच्या युवकाला हा कचरा विकत असल्याचे लक्षात येताच या चमूने त्याला रंगेहात पकडले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या समोर त्याला उभे केल्यानंतर अजनी पोलीस ठाण्याच्या हवाली केले.
सूत्रानुसार, रंगेहात पकडण्यात आलेली ‘आकाश’ नावाची व्यक्ती, ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’च्या कर्मचाऱ्यांना रोज तीन हजार रुपये देऊन रुग्णाच्या वापरात आलेले इंजेक्शन, आयव्ही बॉटल, रबरी नळ्या, ग्लोव्हज व इतरही साहित्य विकत घेऊन दुप्पट भावात भंगारात विकत असल्याची माहिती आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी गंभीर होणार?
जैविक कचरा हाताळणी नियमावलीचे पालन केले जाते की नाही, याची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. मात्र, मंगळवारी या मंडळाचा एकही अधिकारी मेडिकलच्या घटनास्थळी आला नाही. मेडिकल रुग्णालयाचे ‘बायो-मेडिकल वेस्ट’ रोज उघड्यावर जमा केले जात असताना व भंगारात याची विक्री होत असताना याचे गांभीर्य त्यांना दिसून आले नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
थेट वाहनात कचरा
जैविक कचऱ्याची उचल करणाऱ्या एका इसमाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सोबतच ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ला थेट वाहनात कचरा जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल
 

Web Title: The buyer of a biological garbage caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.