स्वप्नातील घर खरेदी होणार महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:05+5:302021-07-10T04:07:05+5:30
नागपूर : बांधकाम साहित्याच्या किमतीत अतोनात वाढ झाल्याने बांधकामाच्या किमतीत पुढील महिन्यात घराच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांपर्यंत ...
नागपूर : बांधकाम साहित्याच्या किमतीत अतोनात वाढ झाल्याने बांधकामाच्या किमतीत पुढील महिन्यात घराच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांपर्यंत अर्थात जवळपास ३०० रुपये चौरस फूट वाढ निश्चित असून, त्याचा फटका बिल्डर्ससह ग्राहकांनाही बसणार आहे. लोकांना स्वप्नातील घर खरेदी महाग होणार आहे.
क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष विजय दर्गन पत्रपरिषदेत म्हणाले, बांधकाम साहित्याच्या किमती गेल्या काही महिन्यापासून निरंतर वाढत असल्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. ग्राहकांना सुविधायुक्त परिसर किफायत दरात देण्यास बिल्डर्स प्रयत्नरत असतात. पण साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रॉपर्टीच्या किमतीत वाढ अपरिहार्य आहे. मुख्यत्वे सिमेंट, रेती, स्टील, लोखंडच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे जुने व नवीन प्रकल्प ऑफर्ससह आणण्याच्या क्षमतेवर मर्यादा आली आहे. नवीन प्रकल्पाची गुंतवणूक वाढल्याने फ्लॅटच्या किमतीत वाढ निश्चितच होणार आहे.
सिमेंटची किंमत ४० ते ५० टक्क्यांनी वाढली
किरकोळ बाजारात सिमेंटची किंमत ४० ते ५० टक्क्यांनी वाढली आहे. मे २०२१ मध्ये २५० रुपयात मिळणारे ५० किलो सिमेंटचे पोते जूनमध्ये ३७० रुपयावर पोहोचले असून, जुलैमध्ये आणखी भाववाढीची शक्यता आहे. स्टीलची किमतही वाढली आहे. लोखंडाची किंमत ३० ते ४० रुपयावरून ६० ते ६५ रुपयावर गेली आहे. यावर्षी जानेवारीनंतर पाईप आणि इन्सुलेशन सामग्रीच्या किमतीत १५ टक्के तसेच पॉलिमर, प्लायवूड, सॅनिटरी वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार, बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने लोकांना स्वप्नातील घर खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यांना घरासाठी जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागणार आहे.
पत्रपरिषदेत क्रेडाई नागपूर मेट्रोचे सचिव गौरव अगरवाला, कोषाध्यक्ष राजमोहन साहू, संतदास चावला, सुनील दुद्दलवार, अनिल नायर, प्रशांत सरोदे, उपाध्यक्ष एकलव्य वासेकर, चंद्रशेखर खुणे, सहसचिव अभिषेक जव्हेरी, विजय जोशी, प्रतीश गुजराती उपस्थित होते.