घर खरेदी आणखी स्वस्त होणार! मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 07:52 PM2020-08-28T19:52:31+5:302020-08-28T19:56:19+5:30
मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त होऊन बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय अप्रत्यक्षरीत्या अन्य क्षेत्रालाही लाभ मिळणार असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त होऊन बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय अप्रत्यक्षरीत्या अन्य क्षेत्रालाही लाभ मिळणार असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.
कोरोना महामारीमुळे चार महिन्यात मुद्रांक शुल्क स्वरुपात राज्य शासनाला कमी महसूल मिळाला होता. खरेदीदारांना फायदा आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेत १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी ३ टक्के आणि १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत २ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. पूूर्वी नागपूर शहरासाठी ६ टक्के आणि ग्रामीण क्षेत्रासाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क होते. पण उपरोक्त कालावधीत शहरासाठी ३ टक्के आणि ग्रामीणकरिता २ टक्के मुद्रांक शुल्क लागणार आहे. क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी म्हणाले, राज्य शासनाने अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेतला असून स्वागतार्थ आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला बूस्ट आणि खरेदीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे इतरही व्यवसायाला चालना मिळेल. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उदाहरण देताना साधवानी म्हणाले, फ्लॅट २० लाखांचा असेल तर पूर्वीच्या १.२० लाखांच्या तुलनेत उपरोक्त कालावधीत ग्राहकांना ६० हजार मुद्रांक शुल्क भरावे लागेल. हीच बाब जास्त किमतीच्या फ्लॅटसाठीही लागू होणार आहे.
नंतर पेजशनकरिता ‘अॅग्रीमेंट टू सेल’ची सोय
साधवानी म्हणाले, ही सवलत विशिष्ट कालवधीसाठी असल्याने रेडी पजेशन फ्लॅट घेणाऱ्यांना फायदा तर होईलच, तसेच
ज्या ग्राहकांना दोन वर्षानंतर फ्लॅटचा ताबा मिळत असेल त्यांना ‘अॅग्रीमेंट टू सेल करून सवलतीचा फायदा घेता येईल.
नागपुंरात गेल्या काही दिवसांपासून घर खरेदीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. बँकांचे गृहकर्जासाठी कमी झालेले व्याजदर, पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी २.६७ लाखांपर्यंत सवलत आणि आता मुद्रांत शुल्कात ३ टक्के सवलत दिल्याने घर खरेदी स्वस्त होणार असून बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळेल. नागपूर शहरात जवळपास ३ हजार रेडी पजेशन फ्लॅट आणि इतर घरकुल उपलब्ध आहेत. त्याच्या विक्रीला चालना मिळणार असल्याचे साधवानी यांनी स्पष्ट केले.