दिवाळी तोंडावर अन् अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 02:44 PM2022-10-14T14:44:42+5:302022-10-14T14:46:45+5:30
बीव्हीजी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढ व बोनस न मिळाल्याने संप
नागपूर : दिवाळी बोनस व वेळवर वेतन मिळावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी वेतनवाढ मिळते. करारानुसार त्याधर्तीवर सफाई कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ मिळावी, यासह अन्य मागण्यासाठी शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी इंडिया प्रा. लि.च्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संप पुकारला. यामुळे शहराच्या अर्ध्या भागातील कचरा संकलन ठप्प झाल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग लागले होते. सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांचा संप कायम होता.
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे सोपविण्यात आलेली आहे. झोन क्रमांक १ ते ५ एजी एन्व्हायरो कंपनीकडे, तर जोन ६ ते १० मधील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील ९०० कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत. दिवाळीमुळे बाजारात गर्दी असताना सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने पाच झोनमधील बाजार भागात कचऱ्याचे ढिगारे जागोजागी लागले होते.
करारानुसार दर सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणे अपेक्षित आहे. तसेच डिझेल दरवाढीनुसार दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मागील अडीच वर्षांत मनपा प्रशासनाकडून दरवाढ मिळालेली नाही. त्यामुळे कचरा संकलन कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी वेतनवाढ दिलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक संप पुकारला. शुक्रवारी कर्मचारी कामावर परतणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कायदेशीर कारवाई केली जाणार
कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक कचरा संकलन ठप्प केल्याने महापालिकेकडून कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून, कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला दिल्याची माहिती मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.