सीए शाखेला देशात सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार; वर्षभर आर्थिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 10, 2024 07:57 PM2024-02-10T19:57:41+5:302024-02-10T19:58:26+5:30
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित संस्थेच्या ८४ व्या वार्षिक समारंभात आयसीएआयच्या १६८ शाखांमध्ये दुसरा पुरस्कार देण्यात आला.
नागपूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम क्षेत्रांतर्गत (डब्ल्यूआयआरसी) कार्यरत नागपूर सीए शाखेला संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ शाखेचा दुसरा पुरस्कार मिळाला.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित संस्थेच्या ८४ व्या वार्षिक समारंभात आयसीएआयच्या १६८ शाखांमध्ये दुसरा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष संजय एम अग्रवाल यांनी स्वीकारला. याप्रसंगी आयसीएआयचे अध्यक्ष सीए अनिकेत तलाटी, उपाध्यक्ष सीए रणजीत कुमार आणि देशभरातील सीए उपस्थित होते.
सीए संजय एम अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात वर्ष २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय सेमीनार, क्षेत्रीय संमेलन, विविध विषयांवर माहितीपूर्ण सेमीनार, अध्ययन मंडळ बैठक आणि विविध गैरशैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले. शिवाय आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ग्रीन मॅरेथॉन, स्वतंत्रता दिवस, व्यापार आणि उद्योग संघांसोबत जीएसटी येथे सार्वजनिक बैठक, अनाथालयात स्टेशनरी वितरण तसेच बजेट आणि जीएसटीवर चर्चा, सहकारी क्षेत्र, करिअर, सीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदींवर चर्चासत्र घेण्यात आले.
या पुरस्कारासाठी संजय अग्रवाल यांचे आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जयदीप शाह आणि अशोक चांडक यांनी अभिनंदन केले. संजय अग्रवाल यांनी या पुरस्कारासाठी नागपूर सीए संस्थेचे सर्व माजी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. पुढील वर्षात नागपूर शाखेला नवी झेप घेण्यासाठी नेहमीच सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला.