सीए अंतिम परीक्षेत मोहम्मद वली देशात २३ वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:21 PM2019-08-13T23:21:41+5:302019-08-13T23:22:38+5:30
यावर्षी मे-जूनमध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नागपूरचा मोहम्मद वली या विद्यार्थ्याने देशात २३ वे स्थान मिळविले आहे. त्याला ८०० पैकी ५४८ गुण मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी मे-जूनमध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नागपूरचा मोहम्मद वली या विद्यार्थ्याने देशात २३ वे स्थान मिळविले आहे. त्याला ८०० पैकी ५४८ गुण मिळाले आहे.
मोहम्मद दोनदा राष्ट्रीयस्तरीय लाँग टेनिस खेळाडू आणि जलतरणपटू आहे. सन २०१२-१३ वर्षात त्याची शाळेचा (एसजीएफआय) कॅप्टन म्हणून निवडीसह २००७ ते २०१२ पर्यंत सलग पाच वर्षांसाठी स्पोर्ट्स आणि अकॅडमिक एक्सलन्स पुरस्काराने काटोल रोड येथील सेंटर पॉईंट स्कूलतर्फे सन्मानित करण्यात आले. त्याला लाँग टेनिसमध्ये ज्युनिअर मुलांमध्ये आशियात तिसरे स्थान मिळाले होते. सीपीटीमध्ये (प्रवेश) २०० पैकी १६२ गुण मिळाले. त्याने आयपीसीसी (इंटरमिडिएट) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पाच विषयात गुणवत्ता श्रेणीसह उत्तीर्ण केली. मुंबईतील ‘एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड एकॉनॉमिक्स’ या कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी संपादन केली. यादरम्यान तीन संशोधन प्रोजेक्ट सादर केले. त्याकरिता त्याला इन्स्टिट्यूटतर्फे प्रॉमिसिंग यंग लिडर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले. बी.कॉमच्या सहा सेमिस्टरमध्ये त्याला ‘ओ’ ग्रेड मिळाली. पहिले दोन वर्ष डेलोइट फर्ममधून आर्टिकलशिप केली. अंतिम तिसऱ्या वर्षात इंडस्ट्रीयन ट्रेनिंगसाठी एचएसबीसीमध्ये आर्टिकलशिप केली. एचएसबीसी येथे ‘डेबिट कॅपिटल मार्केट डिपार्टमेंट’मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली. जेपी शाह इन्स्टिट्यूट, मुंबई येथे आयपीसीसी व सीए फायनलसाठी प्रशिक्षण घेतले.
त्याने यशाचे श्रेय वडील अबाईड अॅण्ड कंपनीचे संचालक अली असगर आणि आई जीएमसी कॉलेजच्या प्रा. डॉ. लुलू फातेमा वली आणि आजी-आजोबांना दिले आहे.