१५ दिवसांअगोदर सीए झाली अन् भविष्याची स्वप्ने गाडीखाली चिरडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:46 AM2023-07-20T10:46:02+5:302023-07-20T10:46:21+5:30

ऐन मुलाखतीच्या दिवशीच काळाचा घाला : २४ वर्षीय तरुणीला व्हॅनने ५० फूट नेले फरफटत

CA happened before 15 days and future dreams were crushed under the car | १५ दिवसांअगोदर सीए झाली अन् भविष्याची स्वप्ने गाडीखाली चिरडली

१५ दिवसांअगोदर सीए झाली अन् भविष्याची स्वप्ने गाडीखाली चिरडली

googlenewsNext

नागपूर : पंधरा दिवसांअगोदरच सीएसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्याने संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. भविष्याची स्वप्ने रंगवत असताना तिच्यासाठी आईवडील पूजा करण्यासाठी देवदर्शनाला गेले. एका नामांकित कंपनीत मुलाखतीची औपचारिकता पार पडणार आणि प्रगतीचे पंख लागणार असेच चित्र होते. मात्र अचानक नियतीचे चक्रच फिरले आणि मुलाखतीच्या काही तास अगोदर एका व्हॅनच्या रूपात काळाने तिच्यावर घाला घातला. राँग साइड आलेल्या बेदरकार व्हॅनच्या धडकेत ती जखमी झाली. उपचारादरम्यान तिने शेवटचा श्वास घेतला. अपघात इतका भयानक होता की ती व्हॅनखाली सुमारे ५० फूट अक्षरश: फरफटत गेली आणि क्षणात स्वप्नांची राखरांगोळी झाली.

वैष्णवी गणेश धर्मे (२४, नेताजीनगर, श्रीराम चौक) असे तरुणीचे नाव आहे. वैष्णवी दोन आठवड्यांअगोदरच सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती सीताबर्डी येथे एका कंपनीत कार्यरत होती. तीन बहिणींमध्ये सर्वात धाकटी असलेल्या वैष्णवीचे आईवडील देवदर्शनासाठी उत्तरप्रदेशमध्ये गेले. रात्री तिच्या सोबतीला सूर्यनगर येथे राहणारी मामेबहीण येत होती. मंगळवारी दुपारी वैष्णवीची नोकरीसाठी ऑनलाइन मुलाखत होती. सकाळी मामेबहिणीला तिच्या घरी सोडून दुचाकीवरून परतत असताना भारतनगर चौकात एम.एच.-३१ ए.जी. ५११७ या व्हॅनच्या चालकाने राँग साइडने बेदरकारपणे गाडी चालवत आणली आणि थेट तिला समोरून धडक दिली.

व्हॅनचा वेग इतका जास्त होता की त्याच्या चाकाखाली वैष्णवी ५० फुटांहून अधिक अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत गेली. तिने हेल्मेट घातले असूनही तिच्या डोक्यासह यकृत व पोटाला मोठी दुखापत झाली. तिला घटनास्थळावरील लोकांनी तातडीने एका खासगी इस्पितळात दाखल केले. तिच्या आईवडिलांना माहिती देण्यात आली व ते विमानाने नागपुरात पोहोचले. मात्र पोटच्या मुलीशी बोलण्याचीदेखील त्यांना संधी मिळाली नाही. उपचारादरम्यान मध्यरात्रीनंतर वैष्णवीने अखेरचा श्वास घेतला. या प्रकारामुळे घटनास्थळावर संतापाचे वातावरण होते.

२३ वर्षे जुनी व्हॅन रस्त्यावर कशी?

घटनास्थळावरील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्हॅनचा चालक अतिवेगात गाडी चालवत होता. व्हॅन २३ वर्षे जुनी होती व चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्सदेखील नव्हते. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

Web Title: CA happened before 15 days and future dreams were crushed under the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.