सीए जीएसटी कार्यान्वयनाचे महत्त्वपूर्ण अंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 09:07 PM2018-06-20T21:07:26+5:302018-06-20T21:07:39+5:30
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून केली आहे. सरकारने या कायद्यात वर्षभरात अनेक बदल केल्यामुळे, ही करप्रणाली आता सर्वोत्तम आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याची आहे. विभागाने आतापर्यंत कोणत्याही व्यापाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी केलेला नाही. या करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चार्टर्ड अकाऊंटंटची भूमिका महत्त्वाची असून, ते जीएसटी कार्यान्वयनाचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे प्रतिसादन राज्यकर नागपूर विभागाचे सहसंचालक पूनमचंद अग्रवाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून केली आहे. सरकारने या कायद्यात वर्षभरात अनेक बदल केल्यामुळे, ही करप्रणाली आता सर्वोत्तम आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याची आहे. विभागाने आतापर्यंत कोणत्याही व्यापाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी केलेला नाही. या करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चार्टर्ड अकाऊंटंटची भूमिका महत्त्वाची असून, ते जीएसटी कार्यान्वयनाचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे प्रतिसादन राज्यकर नागपूर विभागाचे सहसंचालक पूनमचंद अग्रवाल यांनी केले.
चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) नागपूर शाखेतर्र्फे धंतोली येथील सभागृहात जीएसटीवर सहा दिवसीय सखोल अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अग्रवाल बोलत होते. यावेळी आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य सीए अभिजित केळकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए उमंग अग्रवाल, सीएद्वय रितेश मेहता, किरीट कल्याणी, शैलेंद्र जैन, संजय एम. अग्रवाल, साकेत बागडिया, राजीव सावंगीकर, आरती पाल्डीवाल, आयुष अग्रवाल, यश बुद्धवानी प्रामुख्याने उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले, एक वर्षापासून करप्रणालीत वारंवार बदल करण्यात येत असल्यामुळे, व्यापाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. विभागाची आयटी सुविधा अद्ययावत झाली आहे. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांतर्फे दूर करण्यात येत आहेत. कायद्यात होणाऱ्या बदलांवर शाखेने जीएसटीची सखोल माहिती देण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करावे.
केळकर यांनी कायद्यात होणाऱ्या बदलांची माहिती दिली. दरदिवशी ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी सीएंनी नवीन कायदा शिकण्यास आणि समजण्यास उत्सुक असावे. प्रारंभी उमंग अग्रवाल यांनी जीएसटीवर जनजागृती करण्यासाठी शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. संस्थेचे विविध प्रस्ताव ऐकून आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी राज्यकर विभागाचे आभार मानले.
कार्यशाळेत सीएद्वय शैलेंद्र जैन, रितेश मेहता, हेमंत सावंगीकर, सतीश सारडा, मिलिंद पटेल, प्रीतम बत्रा यांनी जीएसटीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक सीए संजय अग्रवाल यांनी केले तर सचिव सीए किरीट कल्याणी यांनी आभार मानले.