सीएंची चुकी कधीही दडपण्यात येत नाही : सीए प्रफुल्ल छाजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:18 AM2019-10-19T00:18:29+5:302019-10-19T00:19:11+5:30
कोणत्याही प्रकरणात सीएंची चुकी असेल तर ती दडपण्याचा प्रयत्न आयसीएआय कधीही करीत नाही, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कागदपत्रांची पडताळणी आणि प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी आयसीएआय सदस्याची असते. सत्यम प्रकरणात दोषी सीएंवर कारवाई करण्यात आली होती. कोणत्याही प्रकरणात सीएंची चुकी असेल तर ती दडपण्याचा प्रयत्न आयसीएआय कधीही करीत नाही, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष सीए प्रफुल्ल छाजेड यांनी येथे व्यक्त केले.
आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे शुक्रवारी जीएसटीवर आयोजित कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य, सीए अभिजित केळकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, सचिव सीए साकेत बागडिया आणि उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी उपस्थित होते.
छाजेड म्हणाले, आयसीएआयकडे नोंदणी नसलेल्या सीएद्वारे बनावट स्वाक्षऱ्या केल्याच्या तक्रारी आयसीएआयकडे प्राप्त व्हायच्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयसीएआयच्या व्यावसायिक विकास समितीने टप्प्याटप्प्याने युडीन म्हणजेच युनिक डॉक्युमेंट आयडेन्टिफिकेशन नंबरची एक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविली. १ फेब्रुवारी २०१९ पासून अनिवार्य करण्यात आली. यामुळे व्यवहारात पारदर्शकता आली आहे. यामुळे एनपीए अकाऊंटची माहिती तात्काळ मिळते. एका प्रश्नाच्या उत्तरात छाजेड म्हणाले, सीए विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये कोड सिस्टिम आहे. पेपरचे डिजिटल मूल्यांकन केले जाते. सर्व यंत्रणा ऑनलाईन आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पेपरचे पुनर्मूल्यांकन करावे वा नाही, याकरिता एक समिती नेमली असून चार महिन्यात अहवाल येणार आहे.
जीएसटीला दोन वर्षे झाली आहेत. पुढे पुढे यातील त्रुटी दूर होणार आहे. परतावा लगेच मिळण्याची शक्यता आहे. खरी समस्या चेनमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्राची सबका विश्वास, योजना अबकारी आणि सेवाकराशी प्रलंबित खटल्याशी संबंधित आहे. यात व्यापाऱ्यांना सूट देऊन कराची एकल रक्कम भरण्याची सोय आहे. त्याचा व्यापाऱ्यांना फायदाच होणार आहे. सीए कोर्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. भारतीय सीएला ब्रिटनमध्ये एक पेपर देऊन सीएची मान्यता मिळते, असे छाजेड यांनी स्पष्ट केले.