अभ्यासाच्या तणावातून सीएच्या विद्यार्थ्याने २० व्या माळ्यावरून घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 08:39 PM2022-11-01T20:39:45+5:302022-11-01T20:40:10+5:30
Nagpur News अभ्यासाच्या तणावातून इमामवाडा येथील टाटा कॅपिटल हाईट्च्या २० व्या माळ्यावरून उडी घेऊन एका २१ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
नागपूर : अभ्यासाच्या तणावातून इमामवाडा येथील टाटा कॅपिटल हाईट्च्या २० व्या माळ्यावरून उडी घेऊन एका २१ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडली . या घटनेमुळे मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांसह टाटा कॅपिटल हाईट्सच्या रहिवाशांमध्ये शोककळा पसरली आहे.
हर्ष अमित राजा (२१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो टाटा कॅपिटल हाईट्समध्ये फ्लॅट क्रमांक ६०६ मध्ये आपल्या आईवडील आणि दोन भावंडांसह राहत होता. हर्ष सीए करीत होता. हर्षचे वडीलही चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. तर मोठा भाऊ अयान सीए करीत असून, लहान भाऊ कुश नववीत शिकत आहे. हर्षची ३ नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होणार होती. अभ्यास न झाल्यामुळे तो तणावात असल्याची माहिती आहे.
सोमवारी ३१ ऑक्टोबरला रात्री हर्ष सहाव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये आपल्या खोलीत अभ्यास करीत होता. मंगळवारी पहाटे त्याच्या खोलीचा बायोमेट्रिक दरवाजा उघडण्याचा आवाज आला. दरवाजाचा आवाज ऐकून हर्षची आई आरती आणि वडील अमित राजा झोपेतून जागी झाले. हर्ष फ्लॅटमधून बाहेर पडून लिफ्टने २० व्या माळ्यावर गेला. त्यानंतर टेरेसवरून त्याने खाली उडी घेतली.
हर्षचे आईवडीलही त्याला बाहेर जाताना पाहून त्याला शोधण्यासाठी इमारतीच्या खाली आले. मात्र त्यांना हर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. हर्षच्या आईवडिलांचा आक्रोश ऐकून इमारतीतील रहिवासी झोपेतून जागी झाले. हर्षला पाहून शेजाऱ्यांनाही धक्का बसला. लगेच त्यांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. हर्षच्या शेजारी राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने याची माहिती इमामवाडा पोलिसांना दिली. इमामवाडाचे उपनिरीक्षक व्यवहारे यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. मंगळवारी दुपारी हर्षवर शोकाकुल वातावरणात गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हर्षच्या आत्महत्येमुळे आईवडील, भावंड हादरले
हर्ष हा मनमिळाऊ स्वभावाचा असल्यामुळे टाटा कॅपिटल हाईट्समधील सर्वच रहिवाशांचा आवडता होता. घरात त्याची आई आरती, वडील अमित हे त्याला जिवापाड जपायचे. हर्ष आपले दोन्ही भाऊ अयान आणि कुशसोबत मिळूनमिसळून राहायचा. या सुखी कुटुंबाला दृष्ट लागली अन् हर्षने आत्महत्येचा निर्णय घेतला. हर्षच्या आत्महत्येमुळे त्याच्या आईवडिलांसह दोन्ही भावंड हादरले आहेत. गणेशोत्सव असो की सोसायटीतील कोणताही समारंभ हर्ष त्यात आवर्जून सहभागी व्हायचा. हसतमुख असल्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. त्याच्या आत्महत्येमुळे टाटा कॅपिटल हाईट्समधील ३५० कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.
..........