एकाही मुस्लिमावर ‘सीएए’मुळे अन्याय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:47 AM2019-12-23T10:47:54+5:302019-12-23T10:48:55+5:30

काँग्रेसने तर मुस्लिमांना केवळ ‘व्होट मशीन’प्रमाणेच वापरले आहे, या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्यापासून कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केले.

'CAA' is not unfair to any Muslim! | एकाही मुस्लिमावर ‘सीएए’मुळे अन्याय नाही!

एकाही मुस्लिमावर ‘सीएए’मुळे अन्याय नाही!

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसकडून व्होट बँकेसाठी मुस्लिमांची दिशाभूल, सीएए समर्थनार्थ भव्य रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यामुळे देशातील मुस्लिम बांधवांना कुठलाही त्रास होणार नाही. या कायद्यामुळे मुस्लिमांना कुठलाही धोका नाही. परंतु काँग्रेस व इतर तत्त्व मुस्लिमांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करीत आहेत. काँग्रेसने तर मुस्लिमांना केवळ ‘व्होट मशीन’प्रमाणेच वापरले आहे, या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्यापासून कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केले. लोकाधिकार मंचतर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समापनप्रसंगी संविधान चौक येथे ते बोलत होते.
यशवंत स्टेडियम येथून सकाळी १० च्या सुरुवातीला या रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटना तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक, अशी ही रॅली होती. रॅलीमध्ये हजारो लोक या कायद्याच्या समर्थनार्थ एकत्रित आले होते. विशेष म्हणजे रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील सहभागी झाले होते. रॅलीच्या समापनप्रसंगी गोविंददेवगिरी महाराज, अंजनगाव सुर्जी येथील श्रीदेवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज, खा. विकास महात्मे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ.मोहन मते, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, माजी खासदार अजय संचेती, महापौर संदीप जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. आम्ही जातीय भेदाभेद मानत नाही. समाजातून अस्पृश्यता व जातीयवाद आम्हाला दूर करायचा आहे. राममंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याने ठेवली होती. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आजवर आपल्या देशाने जगाला सहिष्णूता शिकविली आहे. आम्हाला कुणी सहिष्णूता शिकवू नये. मतांच्या राजकारणातून नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे, हे हिंदूंना जातीवादी म्हणणाऱ्यांनी समजून घ्यायला हवे. नागरिकत्व कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. मुस्लिमांवर कधीही अत्याचार होऊ देणार नाही. कुणीही अपप्रचारात फसू नये, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

महात्मा गांधींच्या शब्दाची पूर्तता
पाकिस्तान व बांगला देशमधील अल्पसंख्यकांना तेथे अन्यायग्रस्त वाटत असेल तर त्यांना भारत आधार देईल, असे खुद्द महात्मा गांधी म्हणाले होते. संविधानात बाबासाहेबांनी स्पष्ट केले की, बाहेरून येणारे हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई, पारशी हे शरणार्थी आहेत. मुस्लिम लोकांना १५० देशांचा विकल्प आहे व ते तेथे शरण घेऊ शकतात. संविधानानुसारच सरकार काम करीत आहे व यामुळे इतर देशांत अन्याय सहन करीत असलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई, पारशी नागरिकांना देशाचे नागरिकत्व मिळणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

‘सीएए’ देशहिताचा कायदा : फडणवीस
नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशाच्या फायद्याचे आहे. यामुळे असंख्य हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई, पारशी यांना हक्काचे नागरिकत्व मिळणार आहे. या विधेयकाला लोकांचे समर्थन आहे, म्हणूनच सुटीचा दिवस असूनदेखील घरी न बसता लोक रस्त्यांवर आले आहेत. देशाच्या हितासाठी असलेला हा कायदा आहे. कुठलाही धर्म, समाजाच्या विरोधात हा कायदा नाही. काही राजकीय पक्ष लोकांना भडकवून त्यांची माथी फिरविण्याचे काम करीत आहेत. या माध्यमातून देशात अराजकता माजविण्याचे त्यांचे षङ्यंत्र आहे. परंतु देश या कायद्याच्या समर्थनार्थ आहे. सर्वांनी या कायद्यातील तरतुदी समजावून घ्याव्यात, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.


 

Web Title: 'CAA' is not unfair to any Muslim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.