पश्चिम बंगालमध्ये ‘सीएए’ लागू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:28+5:302021-03-22T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : तृणमूल काँग्रेसनंतर आता भाजपनेदेखील निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : तृणमूल काँग्रेसनंतर आता भाजपनेदेखील निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत ‘सीएए’ लागू करण्यात येईल, शिवाय मुख्यमंत्री शरणार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक शरणार्थी कुटुंबाला दरवर्षी १० हजारांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. जाहीरनाम्याला ‘सोनार बांग्ला संकल्प पत्र’ असे नाव भाजपने दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीरनामा जारी केला. राज्य शासनाच्या सर्व नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण, तसेच पाच वर्षांच्या आत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्यात येईल, असा दावाही यावेळी करण्यात आला. बांगला भाषेला संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा बनविण्यासाठी केंद्र प्रयत्न करेल, असेदेखील शहा यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात निधी
शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येईल. ७५ हजार शेतकऱ्यांना १८ हजार रुपये तीन वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या सरकारने दिलेले नाहीत. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे.
जाहीरनाम्यातील इतर महत्त्वाचे मुद्दे...
- मत्स्य पालकांना दरवर्षी सहा हजारांची आर्थिक मदत
- शेतकऱ्यांना दरवर्षी १० हजारांचा निधी
- शेतकरी आर्थिक सुरक्षेसाठी ५ हजार कोटींचा निधी
- लहान शेतकरी व मच्छिमारांसाठी ३ लाखांचा अपघात विमा
- बंगालमधील कला, साहित्य प्रचारासाठी ११ हजार कोटींचा निधी
- नोबेल पुरस्कारांप्रमाणे टागोर पुरस्कार सुरू करणार
- राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार
- मुलींना केजी टू पीजी मोफत शिक्षण
- महिलांना सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवास
- उत्तर बंगालमध्ये ‘एम्स’ स्थापन करणार
- प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी व शौचालय
- शाळांच्या विकासासाठी २० हजार कोटींचा ईश्वरचंद्र विद्यासागर निधी
- पाच विद्यापीठांचा जागतिक दर्जाप्रमाणे विकास करणार
- २२ हजार कोटींचा कोलकाता विकास निधी, कोलकात्याला आंतरराष्ट्रीय शहर बनविणार