सीएबी विधेयकामुळे संविधानाच्या तत्वांना आघात : गणेश देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:09 AM2019-12-17T00:09:50+5:302019-12-17T00:11:15+5:30
मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धर्म जोडण्यासाठी असतो, विभागण्यासाठी नाही. धर्माचे राजकारण करण्याला संविधान परवानगी देत नाही. मात्र धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे षडयंत्र मनात ठेवून केंद्र सरकारने नागरिकत्त्व सुधारणा विधेयक (सीएबी) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) हे कायदे आणले आहेत. हे विधेयक संविधान विरोधी असून संविधानाच्या मूळ तत्वांना आघात पोहचविणारे आहेत. मोदी सरकार अर्थव्यवस्थेतील भयंकर अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी देश पेटवत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी केला.
नागरिकात्व सुधारणा विधेयक तसेच एनआरसीविरोधात आसाम व दिल्लीनंतर संपूर्ण देशात आंदोलनाचे लोन पसरत चालले आहेत. सोमवारी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपुरातही राष्ट्र सेवा दल, दक्षिणायन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आम आदमी पार्टी, जामिया संघटना व सर्व सेवा संघ अशा विविध संघटनांनी मिळून सीएबी विरोधात आंदोलन केले. कॉटन मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. देवी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला. याप्रसंगी प्रभू राजगडकर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अमिताभ पावडे, प्रज्ज्वला तट्टे, अतुल देशमुख, राजेंद्र झाडे, जगजित सिंह, शालिनी अरोरा, सविता सिंघल, रत्ना ढोरे, नरेंद्र पालांदूरकर, संजय बोंडे, सर्व सेवा संघाचे विद्रोही आदी प्रमुख विचारकांसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. देवी यांच्या नेतृत्वात उपस्थित सर्वांनी नागरिकत्त्व सिद्ध करण्यासाठी कुठलेही कागदपत्र सादर न करण्याची शपथ घेतली. अविनाश पाटील यांनीही केंद्र सरकारला लक्ष्य केले. धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करण्याचे काम सरकार करीत आहे. आपण सर्वांनी एकत्र राहून त्यांचे षडयंत्र हानून पाडू, भारतीय एकता धर्मनिरपेक्ष आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल, अशी भावना त्यांनी मांडली. इतर विचारवंतांनीही आपले विचार व्यक्त करीत सीएबी विरोधात भावना मांडल्या.
१९ ला देशव्यापी आंदोलन
नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात आंदोलन केले जाणार आहे. यादिवशी नागपुरातही कॉटन मार्केट परिसरात याच स्थळी उपस्थित राहून देशव्यापी आंदोलनाचा भाग होणार असल्याचे अमिताभ पावडे यांनी सांगितले. नागरिकांनी संविधानविरोधी विधेयकाविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.