हिवाळी अधिवेशनाअगोदर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 10:52 AM2022-10-25T10:52:50+5:302022-10-25T10:54:44+5:30
हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार
नागपूर : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत असताना राज्य शासनाने यासंदर्भात नेमकी ‘डेडलाइन’ निश्चित केली आहे. हिवाळी अधिवेशनाअगोदर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
कोरोना कालावधीमुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. यंदा दोन आठवडे अधिवेशन निश्चितपणे चालेल. राज्य सरकारची तर तीन आठवडेदेखील अधिवेशन चालविण्याची तयारी आहे. जर आमदारांची इच्छा असेल तर त्यांचे नववर्ष नागपुरात साजरे होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्नच नाही
उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात हातमिळवणी करणार का ? याबाबत विचारणा केली असता त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमचे मन फार जास्त दुखावले आहे. त्यामुळे असे पाऊल उचलण्यात येणारच नाही, असे त्यांनी सांगितले.
मनसेसोबत ‘मनसे’ युती, राजकीय नाही
मनसेसोबत युती होणार का ? या प्रश्नावर फडणवीस यांनी आमची राज ठाकरे यांच्यासोबत ‘मनसे’ मैत्री आहेच. तसे पाहिले तर आमचे सगळेच मित्र आहेत. मनसेसोबत ‘मनसे’ युती आहे; पण ती राजकीय नाही, असे फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी रस्त्यावर उतरले हे काँग्रेससाठी बरे झाले
काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेबाबत विचारणा केली असता कुठलाही पक्ष त्यांचे नेते रस्त्यावर उतरतात, तेव्हाच मोठा होतो. राहुल गांधी रस्त्यावर उतरले हे काँग्रेससाठी बरेच झाले, असे प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केले.
आणखी काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस ?
- विदर्भ विकास मंडळाच्या पुनर्गठन मंजुरीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला
- नागपूर विमानतळ खासगीकरणाचा निर्णय महिनाभरात
- समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नोव्हेंबरमध्ये
- गडचिरोलीत स्टील कंपनी उभारण्यास प्राधान्य, ९० टक्के लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध
- सायबर गुन्ह्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणार
- स्पीड रेल्वेसोबतच कार्गो रेल्वेही सुरू करण्याचा विचार, डीपीआर तयार होणार
- रिफायनरी समुद्र किनाऱ्यालगतच, विदर्भात पेट्रोकेमिकल्स काॅम्प्लेक्ससाठी प्रयत्न
- मंडळ वाटपासाठी समिती स्थापन
- एमसीएच्या निवडणुकीत सहभागी न होणारा मी एकमेव मुख्यमंत्री
- वैद्यकीय कक्षाला गती देण्यासोबत धर्मदाय कक्षही सुरू होणार