मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलनाचा अधिकार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:12+5:302020-12-23T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मुळात मंत्र्यांनी आंदोलनाची भाषा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मुळात मंत्र्यांनी आंदोलनाची भाषा करू नये. त्यांनी जबाबदारीचे भान राखले पाहिजे. मंत्र्यांना असे बेशिस्त वागता येत नाही व त्यांना आंदोलनाचा अधिकारदेखील नाही. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर कडू यांचा राजीनामा मागितला असता, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरात मंगळवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
मंत्र्यांनी अगोदर स्वत:ची भूमिका व बंधने स्पष्ट करून घ्यावी. एक तर मंत्रिपदावर राहावे किंवा रस्त्यांवर येऊन आंदोलन करावे. कडू यांची भूमिका चुकली आहे, असे मत अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले. सध्या कृषी बिलांच्या मुद्द्यावर दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या सोबत असल्याची भूमिका घेतली आहे. जर हे तीनही पक्ष खरोखर शेतकऱ्यांशी प्रामाणिक असतील तर ते महाराष्ट्रात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी करणार नाहीत असा अध्यादेश का काढत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ग्रामपंचायत निवडणुकांत कुणाशीही आघाडी नाही
राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढवेल. सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वंचित पॅनलच्या नावाने निवडणुका लढवतील. या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.