गोवा कॉलनीत गुंडाकडून केबल ऑपरेटरची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:13 AM2020-12-05T04:13:08+5:302020-12-05T04:13:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तरुणांच्या दोन गटांतील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवा कॉलनीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुणांच्या दोन गटांतील वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवा कॉलनीत गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली. गुलशन गोपाल कनोजिया (वय २५) असे मृताचे नाव असून तो आझाद चौक धोबीपुरा येथील रहिवासी होता.
केबल ऑपरेटर असलेल्या गुलशनचे मित्र आसिफ कुरेशी, त्याचा भाऊ बंटी कुरेशीसोबत गुरुवारी सकाळी आरोपी करण मडावी, सोहेल अली तसेच अंशूल सिंग सोबत वाद झाला होता. यावेळी एकमेकांनी पाहून घेण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे समेट घडविण्याच्या उद्देशाने गुलशन त्याच्या मित्रांसोबत गोवा कॉलनीत गुरुवारी रात्री १०.२० च्या सुमारास गेला. तेथे आरोपी आधीच तयारीत होते. गुलशन आणि साथीदार गेम करण्याच्या उद्देशाने आले, असे वाटल्यामुळे आरोपी करण मडावी, सोहेल अली, अंशूल सिंग आणि त्याच्या साथीदारांनी गुलशनला घेरले. त्याच्यासोबत वाद घालून आरोपींनी गुलशनवर चाकू, लोखंडी रॉडने हल्ला चढवून त्याची हत्या केली. या घटनेमुळे गोवा कॉलनी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मोठा जमाव आरोपींकडे धावला. त्यांनी एकाला पकडून त्याची बेदम धुलाईही केली. त्यानंतर जमाव सदर पोलीस ठाण्यात धडकला. त्यांनी या हत्येच्या घटनेबाबत तीव्र रोष व्यक्त केला. माहिती कळताच वरिष्ठही तेथे पोहचले. नंतर सदर पोलिसांनी धावपळ करून आरोपींची शोधाशोध केली. रोहित गोपाल कनोजिया (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपरोक्त तिघांना अटक करण्यात आली.
---
अंशूल सिंग रेकॉर्डवरचा गुन्हेगार
या प्रकरणातील आरोपी अंशूल सिंग हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. नावाला त्याची पानटपरी आहे. मात्र, तो गुन्हेगारीत सक्रिय आहे. आरोपी सोहेल चायनीजची टपरी चालवितो. तर, करण मडावीसुद्धा गुन्हेगाराच्या संपर्कात असतो.
---
ठाण्यातून माहिती देण्यास टाळाटाळ
या घटनेला २० तासांपेक्षा जास्त अवधी झाला तरी पोलीस ठाण्यातून माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. एवढेच काय, रात्री ८ वाजेपर्यंत या प्रकरणात तपास अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक सांगण्यासही पोलीस टाळाटाळ करीत होते.
---