केबल वसुली एजंटच्या खुनातील आरोपीला नाकारला जामीन
By admin | Published: December 20, 2015 03:07 AM2015-12-20T03:07:28+5:302015-12-20T03:07:28+5:30
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका केबल वसुली एजंटच्या खुनातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका केबल वसुली एजंटच्या खुनातील आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
नीलेश महादेवराव हिवरे (२३) असे आरोपीचे नाव असून, तो व्यंकटेशनगर येथील रहिवासी आहे. पीयूष रविराव टेंभेकर (२५) असे मृताचे नाव असून, तो भांडेप्लॉट येथील रहिवासी होता.
२० मार्च २०१५ रोजी पीयूषचा मृतदेह नंदनवन भागातील एनआयटी घरकूलनजीकच्या हनुमानमंदिरच्या मैदानात आढळून आला होता. सिमेंटच्या दगडाने अज्ञात आरोपींनी या युवकाचे डोके ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला होता. नंदनवन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश्वर राऊत यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी तपास करून नीलेश हिवरे आणि शुभम रामूजी हिंगणेकर यांना अटक केली होती. आरोपींविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक पुरावे, वैद्यकीय पुरावे आढळून आले होते.
आरोपी नीलेश हिवरे यांनी जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र प्रकरण गंभीर असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक मनीष वाकोडे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)