नागपूर मेडिकलमध्ये ‘कॅडेव्हर लॅब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:11 AM2020-12-05T04:11:56+5:302020-12-05T04:11:56+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : शल्यचिकित्सेकेचे कौशल्य विकसित करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘कॅडेव्हर लॅब’ आवश्यक असते. या ‘लॅब’मुळे शस्त्रक्रियेतील चुका ...
सुमेध वाघमारे
नागपूर : शल्यचिकित्सेकेचे कौशल्य विकसित करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘कॅडेव्हर लॅब’ आवश्यक असते. या ‘लॅब’मुळे शस्त्रक्रियेतील चुका टाळता येतात. शस्त्रक्रियेत अचूकता येते. महत्त्वाचे म्हणजे, आत्मविश्वास निर्माण होतो. याच उद्देशाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी एक पाऊल पुढे टाकत ‘कॅडेव्हर लॅब’ उभारण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ‘लॅब’ नववर्षात सुरू होत आहे.
मृतदेहावरील प्रात्यक्षिक अभ्यास हा वैद्यकीय कौशल्य प्राप्त करण्याचा पाया ठरतो. विशेषत: एमबीबीएसचे पहिले वर्ष मृतदेहावरच (कॅडेव्हर) शिकविले जाते. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ताण असतो. यामुळे त्याचे महत्त्व कळत नाही. परंतु तोच विद्यार्थी पुढे जेव्हा विविध विषयांतील शल्यचिकित्सक होतो, तेव्हा शरीररचनाशास्त्राचे महत्त्व त्याला कळते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वरिष्ठ डॉक्टरांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेत तो शस्त्रक्रियेत निपुण होतो. परंतु यात बराच कालावधी जातो. परंतु ‘कॅडेव्हर लॅब’मुळे हा कालावधी कमी होतो. सध्या देशात ‘केईएम’ व चेन्नई येथील रुग्णालयातच ही ‘लॅब’ असून राज्यातील मेडिकलमधील हा पहिलाच प्रयोग आहे.
-म्हणूनच कॅडेव्हर लॅबचा निर्णय
अधिष्ठाता डॉ. मित्रा म्हणाले, मेडिकलमध्ये देहदान केल्यानंतर त्यावर रासायनिक प्रक्रिया करून ठेवले जाते. परंतु अशा मृतदेहांवर शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देणे अवघड जाते. विशेषत: अशा मृतदेहाचे अवयव व शरीर हे कडक होतात. यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया आणि अशा मृतदेहावरील शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण यात बरेच अंतर येते. म्हणूनच ‘कॅडेव्हर लॅब’चा निर्णय घेतला. या ‘लॅब’मुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
-पहिल्या टप्प्यात १० मृतदेह ठेवण्याची सोय
शरीररचनाशास्त्र विभाग, शल्यचिकित्सा विभाग व अस्थिव्यंगोपचार विभागाच्या संयुक्त उपक्रमातून ‘कॅडेव्हर लॅब’ची निर्मिती होत आहे. यात जे मृतदेह मेडिकलला मिळतील त्यांची स्थिती पाहून ते या ‘लॅब’मध्ये ठेवले जातील. यासाठी विशेष शीतगृह उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यात १० मृतदेह ठेवण्याची सोय केली जात आहे. या ‘लॅब’साठी अस्थिरोग विभागाचे डॉ. सौरभ शहा, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. प्रवीण भिंगारे व शरीररचना शास्त्र विभागाच्या डॉ. अभिलाषा वाहने प्रमुख असतील.
-गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत प्रावीण्य ()
‘कॅडेव्हर लॅब’मधील मृतदेहावर प्रात्यक्षिक केल्याने हातून होणाऱ्या चुकांची भीती दूर होते. या ‘लॅब’मुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत प्रावीण्य प्राप्त करण्याचे कौशल्य अधिक विकसित होते. सध्या लॅबचे काम पूर्णत्वास आले आहे. यंत्रसामग्री वेळेत मिळाल्यास पुढील दीड महिन्यात ही ‘लॅब’ विद्यार्थ्यांसाठी सुरू होईल.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल