वाघाचे अवयव तस्करी करणारा आराेपी पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:01+5:302021-07-31T04:08:01+5:30
नागपूर : वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या एका आराेपीला नागपूर वनविभागाच्या पथकाने अटक केली. या आराेपीला त्याच्या मध्य प्रदेशातील बिछवासहानी ...
नागपूर : वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या एका आराेपीला नागपूर वनविभागाच्या पथकाने अटक केली. या आराेपीला त्याच्या मध्य प्रदेशातील बिछवासहानी या गावातून जेरबंद केले. या आराेपीकडून वाघाचे पंजे, कातडी तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.
५५ वर्षीय माेतीलाल केजा सलामे असे या आराेपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वनविभागातर्फे वन्यजीव तस्करीतील आराेपींवर कारवाईसाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबतची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार एक पथक तयार करून मध्य प्रदेशला पाठविण्यात आले. पथकाने याेग्य काळ साधून आराेपी माेतीलाल सलामे याच्या गावी धाड टाकली. कारवाईदरम्यान सलामेच्या शेतशिवारातील घरात वाघाचे अवयव आढळून आले. यामध्ये वाघाचे चार पंजे, कातडी, आराेपीचा माेबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आराेपीविरुद्ध वन्यजीव अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने आराेपीला ३ ऑगस्टपर्यंत वन काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. व्याघ्र तस्करीचे माेठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. ही कातडी आणि पंजे कुठून आणले, कुठे शिकार केली, याबाबत खुलासा हाेणे बाकी आहे. आराेपीकडून व्याघ्र अवयव तस्करीच्या आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची आणि अशा प्रकरणातील इतर गुन्हेगारांपर्यंत पाेहोचण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.
नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा यांच्या मार्गदशर्नात झालेल्या कारवाईमध्ये पथकप्रमुख व उमरेडचे सहाय्यक वनसंरक्षक एन.जी. चांदेवार, खापा वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एन. नाईक, बुटीबाेरी वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठाेकळ, फिरते पथक वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. माेहाेड, नागपूर व खापा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक डाेंगरे, शेंडे, भाेसले यांचा सहभाग हाेता. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक एस. टी. काळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.