नागपुरातील ट्रॉमात प्रायोगिक स्तरावर कॅज्युअल्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:16 AM2018-06-12T01:16:51+5:302018-06-12T01:17:06+5:30
महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता मेडिकलच्या अपघात विभागात जाण्याची गरज पडणार नाही. थेट ट्रॉमातच तातडीने उपचार होतील. मेडिकल प्रशासनाने यासाठी सहा वरिष्ठ निवासी डॉक्टर व दोन ‘कॅज्युअल्टी मेडिकल आॅफिसर’ (सीएमओ) उपलब्ध करून दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता मेडिकलच्या अपघात विभागात जाण्याची गरज पडणार नाही. थेट ट्रॉमातच तातडीने उपचार होतील. मेडिकल प्रशासनाने यासाठी सहा वरिष्ठ निवासी डॉक्टर व दोन ‘कॅज्युअल्टी मेडिकल आॅफिसर’ (सीएमओ) उपलब्ध करून दिले आहेत.
रस्ते अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सोयी मिळाव्यात या दृष्टीने पंतप्रधान सुरक्षा योजनेच्या निधीतून मेडिकलने ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम केले. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण झाले. परंतु आवश्यक सोयी व मनुष्यबळाच्या अभावी ट्रॉमा केअर सेंटर आपल्या मुख्य उद्देशापासून दूर होते. याला घेऊन व ट्रॉमाच्या बांधकामातील त्रुटींना घेऊन ९ मे रोजी महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे प्रमुख आ. गोपालदास अग्रवाल यांच्यासह स्थानिक आमदारांनी पाहणी केली. यात त्यांनी विना कॅज्युअल्टीशिवाय ट्रॉमा केअर सेंटर सुरू असल्यावर आश्चर्य व्यक्त केले. ‘सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम’ नसल्याने रुग्णांवर कसे लक्ष ठेवले जाते याचा जाबही अधिकाऱ्यांना विचारला. या सर्व त्रुटींना घेऊन नुकतेच मुंबईत समितीसमोर वैद्यकीय शिक्षण विभागाला साक्ष द्यावी लागली. यात विभागाच्यावतीने शक्य तितक्या लवकर कॅज्युअल्टी सुरू करण्याचे व ‘सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टम’ लावण्याची ग्वाही देण्यात आली. याला घेऊन आज सोमवारी समितीच्यावतीने विचारणाही झाली. यामुळे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रॉमाची पाहणी करून मंगळवार १२ जूनपासून प्रायोगिक स्तरावर कॅज्युअल्टी सुरू करण्याचे निर्देश दिले. यासाठी सहा वरिष्ठ निवासी डॉक्टर व दोन ‘सीएमओ’ची ड्युटी कॅज्युअल्टीमध्ये लावण्यात आली आहे. याच आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने कॅज्युअल्टी सुरू होण्याचे संकेतही डॉ. निसवाडे यांनी दिलेत.