नागपुरात आंब्यामध्ये आढळले कॅल्शियम कार्बाईड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:09 AM2018-03-27T00:09:34+5:302018-03-27T00:09:45+5:30
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड आढळून आले. ‘एफडीए’ने विक्रेत्याविरोधात खटला दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड आढळून आले. ‘एफडीए’ने विक्रेत्याविरोधात खटला दाखल केला आहे.
राजू रामवचन कटारिया, रा. भोजपूर आजमगड उत्तर प्रदेश असे त्या आंबे विक्रेत्याचे नाव आहे.
अन्न प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी कृत्रिम पद्धतीने फळे पिकविणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती व मार्केट यार्ड कळमना येथील दुकान क्र. ३५ मधून राजू रामवचन हे कॅल्शियम कार्बाईडद्वारे आंबे पिकवीत असल्याची बाब उघडकीस आली. अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी यांनी त्यावर कारवाई करीत २४० किलोचे ३ हजार ६०७ रुपये किमतीचे आंबे जप्त केले. काही आंबे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. विक्रेत्याकडे विक्रीचा परवानाही नव्हता. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला. यात आंबा कॅल्शियम कार्बाईडद्वारे पिकविला गेल्याचे स्पष्ट होऊन आंब्यातच कॅल्शियम कार्बाईड आढळून आले. अहवालानुसार अन्न प्रशासनाने मुख्य न्यायदंडाधिकारी नागपूर यांचे न्यायालयात खटला दाखल केला आहे.
फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडवर प्रतिबंध
कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केंकरे यांनी सांगितले, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यावसायिकांनी विहित परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा व फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करू नये, असे आवाहनही केले.