शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २६ मार्चला भारत बंदची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:12+5:302021-03-25T04:08:12+5:30
नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला जाहीर केलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ नागपुरातील किसान संघर्ष समन्वय ...
नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला जाहीर केलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ नागपुरातील किसान संघर्ष समन्वय समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. दिल्लीमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी या दिवशी नागपुरात व्यापाऱ्यांना समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवून उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील ११० दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आवाहनानुसार २६ मार्चला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. नागपुरातील किसान संघर्ष समन्वय समितीनेही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र नागपुरातील कोरोनाची परिस्थिती, सातत्याने सुरू असलेले लॉकडाऊन त्यामुळे झालेली व्यापाराची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व व्यापाऱ्यांनी या संपाला समर्थन द्यावे, अशी भूमिका घेत आवाहन केले आहे.
विदर्भभर हा बंद पाळला जाणार आहे. मात्र या दिवशी नागपुरात कोणतेही आंदोलन करण्यात येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूर यांची उपासमार होणार नाही, त्यांना गरजेपुरते धान्य व पैसा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने संयोजक अरुण वनकर व अरुण लाटकर यांनी केली आहे.
...
काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा, राज्यभर करणार उपोषण
दरम्यान या बंदला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात आणि महागाईविरोधात राज्यभर उपोषण केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयी उपोषण करण्यात येणार आहे.