शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत विशेष अधिवेशन बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:01 AM2018-12-01T01:01:29+5:302018-12-01T01:02:24+5:30
नागपुरातील कामगार व कर्मचारी संघटनांनी दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालण्यासाठी काढण्यात आलेल्या किसान मुक्ती मार्चचे समर्थन केले. यानिमित्त शुक्रवारी संविधान चौकात शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेने १५ दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कामगार व कर्मचारी संघटनांनी दिल्लीच्या संसद भवनाला घेराव घालण्यासाठी काढण्यात आलेल्या किसान मुक्ती मार्चचे समर्थन केले. यानिमित्त शुक्रवारी संविधान चौकात शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेने १५ दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
देशभरातील २०० च्यावर शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर ह्या किसान मुक्ती मार्चमध्ये सामील झालेले आहेत. या किसान मुक्ती मार्चच्या मागण्यांच्या समर्थनार्थ देशभरातील कामगार, कर्मचारी, आंदोलन करून आपले समर्थन दाखवित आहेत. नागपुरातही सेंट्रल आॅफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या नेतृत्वात जेसीटीयूए, अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, वैद्यकीय प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, बुद्धिजीवी आदींनी निदर्शने केली. नेशन फॉर फार्मर्स या घोषणेखाली ही निदर्शने करण्यात आली. केंद्र शासनाने कृषी क्षेत्रातील संकटावर संसदेचे १५ दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निदर्शनाचे नेतृत्व मोहम्मद ताजुद्दीन, दिलीप देशपांडे, मधुकर भरणे, जेसीटीयूचे गुरुप्रितसिंग, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते अशोक दगडे, जाती अंत संघर्ष समितीचे भीमराव चिकाटे, रामेश्वर चरपे, नासीर खॉ, राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, चंद्रशेखर मालवीय, चंदा मारिया, चंद्रहास सुटे, विश्वनाथ आसई आदींनी केले.