तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं... ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:23+5:302021-04-15T04:07:23+5:30
नागपूर : धार्मिक गुलामगिरीमुळे हजाराे वर्षे मानवी हक्क नाकारलेल्या देशातील तमाम शाेषित, वंचितांच्या झाेपडीत प्रकाश पेरणाऱ्या महामानव डाॅ. बाबासाहेब ...
नागपूर : धार्मिक गुलामगिरीमुळे हजाराे वर्षे मानवी हक्क नाकारलेल्या देशातील तमाम शाेषित, वंचितांच्या झाेपडीत प्रकाश पेरणाऱ्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव बुधवारी घराघरात साजरा झाला. या ज्ञानसूर्याने शाेषित समाजबांधवांच्या उद्धारासाठी मोठे कार्य केले आहे. म्हणून आपल्याला आज जे काही मिळत आहे ते या प्रज्ञासूर्यामुळेच, ही भावना प्रत्येक अनुयायाच्या मनात आहे. भीमराव देव नव्हते पण देवापेक्षा कमी नाहीत. या बाेधिसत्त्वाला प्रत्येक घरातून मानवंदना देण्यात आली.
दरवर्षी अभिवादनासाठी हजाराे अनुयायांची गर्दी दीक्षाभूमी आणि संविधान चाैकात हाेत असते. मात्र कठीण परिस्थितीमुळे दीक्षाभूमी बंद असून संविधान चाैकातही गर्दीला मर्यादा आल्या आहेत. महामारीच्या परिस्थितीमुळे सार्वजनिक उत्साहावर विरजण पडले आहे. आंबेडकरी समाजाने परिस्थितीचा स्वीकार करीत नियमांचे पालन करून घरातच जयंतीचा उत्सव साजरा केला. घरी गाेडधाेड तयार करून आनंदी वातावरणात दिवस घालवला. काही अनुयायी वैयक्तिकपणे दीक्षाभूमी गेटसमाेर जाऊन नतमस्तक झाले. काहींनी संविधान चाैकात विनम्र अभिवादन केले. विविध संस्था, संघटनांच्या माेजक्या सदस्यांनी अतिशय साधेपणाने महामानवाला मानवंदना दिली. काही संघटनांनी ऑनलाईन वैचारिक कार्यक्रमांचे आयाेजन केले. अनेक वस्त्यांमध्ये बुद्धविहारांमध्ये भिक्खुसंघाद्वारे बुद्धवंदना घेण्यात आली. काही मोजक्या नागरिकांनी उपस्थित राहून अभिवादन केले. बाैद्ध बांधवांनी घरांवर पंचशील ध्वज व पताका लावून आपला आनंद व्यक्त करीत असल्याचे चित्र शहरात दिसत हाेते. साेशल मीडियावर बाबासाहेबांच्या जयंतीचे शुभेच्छा संदेश ओसंडून वाहत हाेते. वेगवेगळ्या संदेशांनी अनुयायांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एकंदरीत सार्वजिनक उत्सव नसला तरी उत्साह मात्र घराघरातून ओसंडून वाहत हाेता.