तुम्ही हाक द्या, आम्ही सेवेत हजर राहू : महापौर जोशी यांची नागपूरकरांना साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:17 PM2020-03-27T23:17:53+5:302020-03-27T23:18:33+5:30
ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना घातली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात बाहेर राज्यातील अनेक जण ‘लॉकडाऊन’मध्ये अडकले आहेत. त्यांच्या भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांनी माझ्या स्वीय सहायकाला फोन करावा. ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना घातली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात लॉकडाऊन आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्वांना घरात राहायचे आहे. यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या शंकांचे निरसन करायचे या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या काळात नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. नागरिकांनी घरीच राहावे. विनाकारण बाहेर पडू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी व्यवस्था करीत आहे. किराणा सामान, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळावे, यासाठी प्रत्येक परिसरातील विक्रेत्यांची, दुकानांचे नावे, मोबाईल क्रमांकासह मनपाच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. नागरिकांनी या विक्रेत्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून जे हवे आहे, ते घरपोच मागवावे, असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्त फिरतात आपण का फिरत नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, आपण फिरलो तर विनाकारण गर्दी जमा होईल. ते टाळावे म्हणून आपण फिरणे टाळतोय. उद्यापासून माझ्या गाडीवर स्वत:च्या आवाजात नागरिकांना आवाहन करीत फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
३१ मार्चला पुन्हा साधणार संवाद
३१ मार्च रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत फेसबुकच्या माध्यमातून ते पुन्हा नागरिकांच्या भेटीला येतील.