‘सोशल ड्रिंकिंग’ म्हणत पुरुषांबरोबर महिलाही वळत आहेत व्यसनांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 03:36 PM2023-11-04T15:36:24+5:302023-11-04T15:39:29+5:30
‘सोळावं वरीस धोक्याचं’मध्ये समाजातील भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा
नागपूर : व्यसनांचे वय कमी होतेय, म्हणजेच कमी वयात व्यसनाधिनता जडतेय, पुरुषांच्या बरोबरीनेच महिलासुद्धा प्रचंड प्रमाणात व्यसनांकडे वळत आहेत. 'सोशल ड्रिंकिंग' म्हणता म्हणता व्यसनात कधी रूपांतरित होत आहे, हे त्यांनाही कळत नाही. व्यसनांमुळे वंध्यत्व व नपुंसकता याचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती स्त्री व प्रसुतीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी दिली.
'ओमेगा हॉस्पिटल्स‘ आणि 'ओम चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर' यांच्यावतीने ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हा विशेष कार्यक्रम सायंटिफिक सोसायटीच्या लॉनवर सादर करण्यात आला. ‘कोजागर्ति’ या शीर्षकांतर्गत, समाजामध्ये भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर उपस्थित तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. यात महिलांमधील वाढते व्यसन व आजार यावर डॉ. शेंबेकर बोलत होते. कार्यक्रमाला भूलतज्ज्ञ डॉ. मनीषा शेंबेकर, 'मुक्तांगण' (पुणे) व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होत्या.
- शारीरिक, मानसिक, आर्थिकस्तरावर व्यसनांचे दुष्परिणाम
सध्या समाजामध्ये प्रचंड प्रमाणात अयोग्य छंद, दारू, सिगारेट, तंबाखूसोबतच मोबाइल फोन यांसारखी व्यसने लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत दिसून येत आहेत. याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक स्तरावर दुष्परिणामही दिसून येत आहेत. यामुळे कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका, असे आवाहन डॉ. पुणतांबेकर यांनी केले.
- नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
व्यसनाकडे वळू नका, याकरिता भावनांवर विजय मिळवा, योग्य व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्या, आपल्या मनातल्या सुखदु:खांना योग्य व्यक्तीजवळ मोकळी वाट करून घ्या आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, असा सल्ला डॉ. पुणतांबेकर यांनी वेगवेगळी उदाहरणे सांगत दिला. यावेळी डॉ. शेंबेकर यांनी व्यसन आणि आई होऊ पाहणाऱ्या महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना डॉ. शेंबेकर व डॉ. पुणतांबेकर यांनी माहितीपूर्ण व उपयुक्त अशी उत्तरे दिली.