शहरातून आले, गावाबाहेर क्वारंटाईन झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:24 PM2020-05-20T20:24:33+5:302020-05-20T20:29:52+5:30
अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेलतूरला राहणारा चंदू वर्षभरापासून कामासाठी पुण्यात राहायला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि काम बंद झाले. साधन नसल्याने स्वत:ची सायकल घेतली आणि गावाकडे निघाला. सोबत गावचाच किरणही होता. अतिशय यातना भोगत ८०० किमीची प्रवास करीत त्यांनी गाव गाठले. गावी पोहचले खरे पण गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली. गावाच्या दबावामुळे नातलगांनी स्वीकारले नाही. शेवटी गावाबाहेर असलेल्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले. कोरोना चाचणी करूनच त्यांना प्रवेश मिळेल, पण त्यानंतरही १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल.
चंदू आणि किरण सध्या शाळेत राहत आहेत. घरचे लोक सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा डबा शाळेत नेऊन देतात. हा डबा त्यांनाच स्वच्छ करावा लागतो. ते बाहेर निघू नयेत म्हणून बाहेरून लॉक करण्यात आले आहे. चेहºयावर निराशा आहे पण नाईलाज आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याला औंधजवळ एका कंपनीत काम करणारी दीपा कुही तालुक्यातील डोंगरदरा या गावी पोहचली. पण गावकऱ्यांनी तिला गावातील शाळेत ठेवले. त्या शाळेत बाहेरून आलेली एक मुलगी पूर्वीपासून वास्तव्यास होती. तिची आई घरून जेवणाचा डबा पोहचविते, दुरूनच बोलते. मनाला चटका लावणारी परिस्थिती आहे. दीपासोबत त्या दिवशी भंडारा, वडसा, ब्रम्हपुरी आदी गावच्या २२ मुली ट्रॅव्हल्सने नागपूरला पोहचल्या. एसटीने त्या आपल्या गावी गेल्या तेव्हा त्यांनाही असेच बाहेर ठेवण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील गोसे या गावी दोन किमी दूर असलेल्या शाळेत बाहेरून आलेल्या व्यक्तींना ठेवण्यात आले असून नातलग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात.
गावोगावी सध्या हीच परिस्थिती आहे. शहरात नोकरी, काम व शिक्षण घेणारी गावची मुले जेव्हा परतली तेव्हा गावकऱ्यांनी कठोर भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारला. गावाबाहेर राहण्यासाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी १४ दिवस राहण्याची सक्ती करण्यात आली. गावकऱ्यांच्या दबावापुढे नातलगही हतबल दिसून येत आहेत. गावी येऊनही दूर राहावे लागत असल्याने बाहेरून आलेल्यांमध्ये नैराश्य आहे. पण परिस्थितीपुढे सर्वांचे हात टेकले आहेत.
डर के आगे जीत है
स्वत:ची सुरक्षा आणि भीतीमुळे गावकऱ्यांनी शहरातून आलेल्या आपल्याच माणसाला जवळ न घेता बाहेरच ठेवण्याची कठोर पावले ग्रामस्थांनी उचलली आहेत. मात्र या भीतीमुळेच गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले, असे म्हणायला हरकत नाही. शहरात नियंत्रण ठेवणाºया यंत्रणा आहेत पण गावात हा धोका पसरला तर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गावात येणारे मार्ग बंद केले, पहारा देणे सुरू केले. गावात येणाऱ्या बाहेरच्या माणसाला मज्जाव केला. त्यामुळे गावात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण राखणे शक्य झाले आहे.