पेंटिंगच्या कामासाठी आला, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला
By दयानंद पाईकराव | Published: May 28, 2023 05:10 PM2023-05-28T17:10:52+5:302023-05-28T17:12:12+5:30
अल्पवयीन मुलीचे फोटो मिळवून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
दयानंद पाईकराव, नागपूर: मामाच्या लग्नासाठी पेंटींगचे काम दिलेल्या पेंटरने अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिचा विनयभंग केल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ नोव्हेंबर २०२२ ते २७ मे २०२३ दरम्यान घडली.
शुभम शेंडे (वय २७, रा. साईबाबानगर, लांजेवार शाळेमागे, खरबी) असे आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मामाचे लग्न होते. तिच्या मामाने घराच्या पेंटींगचे काम आरोपी शुभमला दिले होते. मामाचे लग्न असल्यामुळे अल्पवयीन मुलगी मामाच्या घरी गेली होती. आरोपी शुभम पेंटींगचे काम करीत असताना काही दिवस तिच्या मामाकडे मुक्कामी सुद्धा रहायचा. तेथे अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. आरोपीने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यांचे फोनवर बोलणे सुरु झाले. दरम्यान आरोपी शुभमने अल्पवयीन मुलीचे फोटो मिळवून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
तो तिचा पाठलाग करून त्रास देऊ लागला होता. दरम्यान आरोपीने घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वरच्या सहायक पोलिस निरीक्षक वनमाला पारधी यांनी आरोपी शुभम विरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड), ५०६, सहकलम ८, १२ पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. हुडकेश्वर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.