कारागृहातून आला आणि मित्राची केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:24 PM2020-06-11T23:24:16+5:302020-06-11T23:25:59+5:30
नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हातोड्याने हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नुकताच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हातोड्याने हत्या केली.
शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. सुरेंद्र सुखदेव तभाने (वय ३२) असे मृताचे नाव आहे तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे कलवा ऊर्फ दीपक सोनी आणि बाबा पन्नी अशी आहेत. हे दोघेही गुंड आहेत. ते कोरोनामूळे नुकतेच कारागृहातून बाहेर आले आणि त्यांनी गुन्हेगारी सुरू केली.
सुरेंद्र तभाने हा शांतिनगरात राहत होता. तो गावोगावच्या आठवडी बाजारात जाऊन समोसा चिवडा विकायचा शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच साईबाबा नगरात आरोपी राहतात. सुरेंद्र याची आरोपी दीपक सोनी तसेच बाबा पन्नीसोबत मैत्री होती. ते नेहमी एकत्र बसून दारू प्यायचे. नेहमीप्रमाणे आज दुपारी १च्या सुमारास सुरेंद्र तसेच आरोपी कलवा आणि बाबा हे तिघे दारू पीत बसले. ते पाहून सुरेंद्रचा मोठा भाऊ नरेंद्र याने या तिघांना हटकले. घरासमोर दारू पीत बसणे योग्य नाही, लहान मुले बघतात, असे म्हणून त्यांना येथून जाण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी सुरेंद्रला जबरदस्तीने बाजूला असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेले आणि दारू पीत बसले. काही वेळानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे दारू पितापिताच आरोपीने सुरेंद्रच्या डोक्यावर हातोडा आणि दगडाने मारणे सुरू केले. ते पाहून बाजूला खेळणारी मुले आरडाओरड करत तभाने यांच्या घरी आली. त्यांनी नरेंद्र यांना तुझ्या भावाला आरोपी कलवा आणि बाबा पण्णी हातोड्याने मारत असल्याचे सांगितले. त्यामुळे नरेंद्र धावतच गेले. त्याने कलवा याला पकडून दोन ठोसे लगावले. त्याच्या हातून हातोडा हिसकावून घेतला. त्यामुळे कलवाने चाकू काढला मात्र नरेंद्रने प्रतिकार केल्यामुळे आरोपी कलवा तसेच बाबा पन्नी दोघेही तिथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेंद्रला त्याच्या भावाने उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निपचित पडून होता. त्यामुळे नरेंद्र शांतिनगर पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांनी पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. सुरेंद्रला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
परिसरात थरार
भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. पोलिसांनी नरेंद्र चव्हाण यांची तक्रार नोंद घेत आरोपी कलवा उर्फ दीपक सोनी असेच बाबा पन्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.