‘हा’ कॅमेरा रोखणार रुग्णालयातील आगीच्या घटना!५० हून जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट, गळती ओळखणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:18 AM2021-12-04T10:18:22+5:302021-12-04T10:19:10+5:30
Hospital News: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे.
- सुमेध वाघमारे
नागपूर : मागील ११ महिन्यांत राज्यातील रुग्णालयांना लागलेल्या आगीत जवळपास ७२ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट व ऑक्सिजन गळती हे मुख्य कारण होते. सध्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सर्वच शासकीय व मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. यामुळे आगीचा धोका वाढला आहे. तो रोखण्यासाठी आता ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ची मदत घेतली जाणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ७५ ते ८० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. परिणामी, सर्वच ठिकाणी तुटवडा पडला. शेजारील राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली. यावर दाखल एका याचिकेवर न्यायालयाने ५० व त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश दिले.
शासनानेही सर्व शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट उभारण्याला गती दिली. यामुळे बहुसंख्य रुग्णालयांत हे प्लांट स्थापन झाले. परंतु ऑक्सिजनच्या गळतीकडे फारसे कोणाचे लक्ष नाही. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) मात्र ही बाब गांभीर्याने घेतली आहे. गळती ओळखण्यासाठी ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’चा प्रस्ताव तयार केला आहे.
ऑक्सिजनगळतीमुळे येथे घडले मृत्युतांडव
- ९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू.
- २६ मार्च २०२१ रोजी भांडुपच्या ड्रीम मॉलमधील कोविड रुग्णालयातील आगीत ११ रुग्णांचा मृत्यू
- ९ एप्रिल २०२१ रोजी नागपूरमधील वाडी येथील ‘वेल्ट्रिट कोविड केअर सेंटर’च्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू.
- २१ एप्रिल २०२१ रोजी नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात लागलेल्या आगीत २४ रुग्णांचा मृत्यू.
- २३ एप्रिल २०२१ रोजी विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील आगीत १३ रुग्णांचा मृत्यू.
- ६ नोव्हेंबर २०२१ रोजी अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील आगीत ११ रुग्णांचा मृत्यू
काय आहे ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’
मेयोच्या बधिरीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली शेलगावकर यांनी सांगितले, अनेकदा ऑक्सिजनगळती नजरेत येत नाही. स्पर्श करूनही कळत नाही.
अशा वेळी ‘अल्ट्रा सॉनिक कॅमेरा’ महत्त्वाचा ठरतो. हा कॅमेरा हातात पकडून ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर लावल्यास गळती कुठे होते ते कळते. गळती होत असलेली जागा चिन्हांकित करते. या कॅमेऱ्यामध्ये किती दाबाने गळती होत आहे, याची माहितीही मिळते. गळतीचा फोटोही घेतला जाऊ शकतो.