सायबर गुन्हेगारांची ‘कॅमेरून गॅंग’ जेरबंद; नागपूर पोलिसांची कारवाई
By योगेश पांडे | Published: August 23, 2022 06:32 PM2022-08-23T18:32:32+5:302022-08-23T18:34:25+5:30
या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूर : बनावट वेबसाइट तयार करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या 'कॅमरून गॅंग'ला नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने जेरबंद केले आहे. या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनीअटक केली आहे. रॉबर्ट एनग्वा (३२), राऊल एमी चौंगा (२९) व चाकोन्ते जॅक्सन सातो (३२) अशी आरोपींची नावे आहेत.
समर्थ नगर येथील रहिवासी उद्योजक भूषण साबळे यांची कंपनी असून ते ऑनलाइन व्यवसाय करतात. आरोपींनी साबळे यांच्या कंपनीची बनावट वेबसाइट तयार केली. या वेबसाइटची इंडिया मार्टमध्ये नोंदणी केली आहे. याद्वारे त्यांनी ऑनलाइन वस्तू विक्रीची बतावणी सुरू केली. साबळे यांनी गुगलवर 'सर्च' केल्यावर स्वत:च्याच कंपनीची बनावट वेबसाइट आणि जीएसटी क्रमांक दिसला.
साबळे यांनी लगेच सायबर सेलकडे तक्रार केली. पोलिसांच्या सायबर सेलने आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी दिल्लीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. एक पथक दिल्लीला पाठवण्यात आले. तिकडे मेहरोलीत आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या.