नागपुरात कोरोनाच्या सावटात नळकनेक्शन कापण्याची मोहीम,लोकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 08:43 PM2020-03-20T20:43:11+5:302020-03-20T20:44:45+5:30
थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे सांगितले आहे तर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला. यामुळे पथकाला माघारी जावे लागले.
जुनी फुटाळा वस्ती हा परिसर स्लम भागात असूनही येथील रहिवाशांना हजारो रुपयांचे पाणी बिल पाठविण्यात आले आहे. २०० ते ३०० लोकांची ही तक्रार आहे. स्लम भाग असूनही काही लोकांना ३० ते ४० हजाराचे बिल आले आहे. बिल अधिक आल्याने बहुसंख्य लोकांनी ते भरले नाही. त्यामुळे जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन तोडण्यासाठी पथक पाठविले. यामुळे वस्तीतील नागरिक संतप्त झाले. महिला व नागरिकांचा जमाव जमला. या घटनेची माहिती मिळताच आमदार विकास ठाकरे घटनास्थळी पोहचले. येथील नागरिकांची समस्या जाणून घेतली. धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना जादा बिलासंदर्भात विचारणा केली. देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असताना मनपाची नळतोडण्याची मोहीम सुरू असल्याबाबत अधिकाऱ्यांना ठाकरे यांनी जाब विचारला. ग्राहकांच्या तक्रारी जाणून घ्या, रीतसर बिल पाठविण्यास अधिकाऱ्यांना बजावले. त्यानंतर मनपाचे पथक माघारी फिरले. जमावबंदी असताना बंदोबस्तात नळतोडण्याच्या कारवाईमुळे जमाव जमल्याची माहिती मिळाल्याने अंबाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारीही घटनास्थळी आले होते.
४६६ गाळेधारकांचे कनेक्शन कापले
थकबाकी न भरल्याने जलप्रदाय विभागाच्या म्हाडाच्या १७ कॉलनीतील पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रामबाग व रघुजीनगर येथील कॉलनीचे कनेक्शन कापल्याने हजारो गाळेधारकांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. गुरुवारी मोठा ताजबाग ते वांजारीनगर दरम्यानच्या म्हाडा क्वॉर्टरमधील ४६६ गाळेधारकांचा पाणीपुरवठा खंडित केला. जलप्रदाय विभागाचे अधिकारी आयुक्त तुकाराम मुुंढे यांचा धाक दाखवून पाणी कनेक्शन कापत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. नावाने कनेक्शन नसल्याने गाळेधारकांना पाणी बिल भरता येत नाही. वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याची मागणी करूनही मिळत नसल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे.
जमावबंदी असताना म्हाडा क्वॉर्टरमधील मनपाची कारवाईच चुकीची आहे. आयुक्तांचा धाक दाखवून ही कारवाई केली जात आहे. येथील नागरिकांनी वैयक्तिक नळजोडणीची वारंवार मागणी केली आहे. परंतु महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असताना पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई चुकीची असल्याचे प्रभागाचे नगरसेवक सतीश होले यांनी सांगितले. दरम्यान रामबाग व रघुजीनगर येथील गाळेधारकांनी आमदार विकास ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.