नागपुरात २३ जानेवारीला हस्ताक्षराबाबत जनजागृतीसाठी अभियान; ‘ग्लोबल रेकॉर्ड’ बनविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 08:56 PM2018-01-19T20:56:20+5:302018-01-19T20:56:52+5:30
हस्ताक्षराची कला वाचविण्यासाठी इमिनन्स आर्टस् अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे २३ जानेवारीला इंटरनॅशनल हॅन्डरायटिंग अवेअरनेस ड्राईव्ह राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिजिटल युगात प्रत्येक जण लॅपटॉपवर टायपिंग करतो. मोबाईलवर ई मेल टाईप करून पाठवितो. त्यामुळे हस्ताक्षराची कला दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. ही कला वाचविण्यासाठी इमिनन्स आर्टस् अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे २३ जानेवारीला इंटरनॅशनल हॅन्डरायटिंग अवेअरनेस ड्राईव्ह राबविण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री छाबरानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तंत्रज्ञानाच्या युगात हाताने लिहण्याची सवड कुणालाच नाही. त्यामुळे अभियानात २३ जानेवारीला नागरिकांना हाताने लिहिताना एक छायाचित्र काढायचे किंवा व्हिडीओ तयार करावयाचा आहे. व्हिडीओ, छायाचित्र काढल्यानंतर ते इमिनन्स आर्टस् अँड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या ‘राईट टु राईट’ या फेसबुक पेजवर अपलोड करावयाचे आहे. यात शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था सहभागी होऊ शकतात. सहभागी झालेल्या व्यक्ती कोणत्याही भाषेत लिहितानाचे छायाचित्र, व्हिडीओ अपलोड करू शकतात. या पेजवरील डाटा गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे संकलित करण्यात येईल. हस्ताक्षराची कला दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. ही कला येणाऱ्या पिढीसाठी वाचवून ठेवण्याच्या दृष्टीने या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जयश्री छाबरानी यांनी केले आहे.