झाडावर अडकलेला मांजा काढण्यासाठी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:09 AM2021-01-22T04:09:56+5:302021-01-22T04:09:56+5:30
नागपूर : मकरसंक्रांतीच्या पतंगोत्सवाचा जोश उतरल्यानंतर पर्यावरणप्रेमी झाडावर अडकलेला मांजा काढण्यासाठी सरसावले आहेत. झाडावर, विजेच्या तारांवर आणि इतर ठिकाणी ...
नागपूर : मकरसंक्रांतीच्या पतंगोत्सवाचा जोश उतरल्यानंतर पर्यावरणप्रेमी झाडावर अडकलेला मांजा काढण्यासाठी सरसावले आहेत. झाडावर, विजेच्या तारांवर आणि इतर ठिकाणी अडकून असलेला मांजाही पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरतो. त्यामुळे पतंगोत्सवाच्या काळात जखमी पक्ष्यांच्या उपचारासाठी धावणाऱ्या पक्षीप्रेमींनी आता अडकलेल्या मांजामुळे पक्ष्यांना इजा होऊ नये, म्हणून हे जीवघेणे धागे काढण्याची मोहीमही आरंभली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून समविचारी पक्षीप्रेमींना एकत्रित करून पक्ष्यांना वाचविण्यासाठी उपायांची योजना तयार केली गेली. या ग्रुपमध्ये पक्षीतज्ज्ञांचा समावेश असून सर्पमित्र, प्राणीमित्र आणि पक्षीप्रेमींचा समावेश आहे. शेकडो तरुण कार्यकर्ते शहराच्या विविध भागातून तयार झाले. विशेष म्हणजे या ग्रुपच्या तरुण सदस्यांनी पतंगोत्सवादरम्यान झाडावर जखमी असलेले पक्षी काढण्यासह अडकलेला मांजा काढण्याचे प्रशिक्षण रेस्क्यू ऑपरेशनचे तज्ज्ञ राजेश सबनीस यांच्याकडून घेतले आहे.
या अभियानात ग्रोविल फाउंडेशन, बकुळा फाउंडेशन, मॅट्रिक्स वॉरियर्स, आरईईएफ, सीएजी, आय-क्लिन नागपूर, यशोधारा आदी संघटना तसेच वन विभागाचे कर्मचारी, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणवादी, प्राणीमित्र, सर्पमित्र यांनी सहभाग घेतला आहे. पक्षीमित्रांनी अजनीवन, भरतवन, एम्प्रेसवन, सोनेगाव, वसंतराव नाईक वस्ती, अमरावती रोड, अंबाझरी उद्यान, बजेरिया, तकिया वस्ती धंतोली, खामला, रेशीमबाग, पारडी वस्ती, बजेरिया झोपडपट्टी, खामला, पांडे ले-आउट, धंतोली तकिया झोपडपट्टी, पारडी, भांडेवाडी, महाल व रेशीमबाग मैदान, धरमपेठ, महाराजबाग, सोनेगाव तसेच लॉ कॉलेज ते सीताबर्डीपर्यंत हे अभियान चालविले आहे. आठ ते दहा दिवसांत शहराचा संपूर्ण परिसर मांजामुक्त करण्याचा विश्वास ‘लोकमत’शी बोलताना दिला.
- वन विभागाच्या टीमचे सोमवारी अभियान
वन विभाग आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या टीमतर्फे येत्या सोमवारी अंबाझरी जैवविविधता उद्यान तसेच मारुती चितमपल्ली बर्ड पार्कमध्ये झाडांवरील मांजा काढण्यासाठी अभियान राबविले जाणार असल्याची माहिती मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी दिली. हिंगणा वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार असून उद्यानातील झाडे मांजामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या अभियानात सहभागी होण्यासाठी पक्षीप्रेमी व सामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.