ईव्हीएम हटविण्यासाठी संविधान चौकातून महाअभियान : प्रशांत पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 09:32 PM2019-09-06T21:32:05+5:302019-09-06T21:34:57+5:30
ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम हटविण्याची गरज आहे. त्यामुळे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रशांत पवार म्हणाले, ८ सप्टेंबरला दुपारी २ वाजता संविधान चौकातून ईव्हीएम विरोधातील यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात जाऊन १८ सप्टेंबरला मुंबईच्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप होईल. या जनआंदोलनात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, आनंद शिंदे, प्रकाशनाथ पाटणकर हे संविधानावरील गीतांनी प्रबोधन करणार आहेत. शासनाने ईव्हीएम विरोधात यात्रा काढण्यास मनाई केली. परंतु आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे यात्रेला परवानगी मिळाली. ईव्हीएम हटविण्यासाठी आयोजित महाअभियानात सर्व जातीधर्माचे नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अॅड स्मिता कांबळे, राजेश लांजेवार, प्रदीप गणवीर, सुनील जवादे, घनशाम फुसे, आनंद पिल्लेवान, आनंद तेलंग, निखील कांबळे, अनिल भांगे, अॅड आकाश मुन उपस्थित होते.