नागपूर विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूत निवड
By आनंद डेकाटे | Published: June 26, 2023 04:38 PM2023-06-26T16:38:10+5:302023-06-26T16:38:49+5:30
पदव्युत्तर गणित व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी विभागातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड करण्यात आली. विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात मुलाखत प्रक्रिया पार पडली.
नवी मुंबई येथील ट्रँगल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे संचालक सतीश तोटे यांच्याकडून ही मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी प्रशिक्षण व रोजगार अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. या कंपनीच्या मुलाखतीकरिता विद्यापीठाच्या गणित, इलेक्ट्रॉनिक्स आणि पदार्थ विज्ञान पदव्युत्तर पदवी विभागातील ४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
या चाळीस विद्यार्थ्यांमधून चाळणी परीक्षेत ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर या ९ विद्यार्थ्यांमधून मुलाखत घेत ४ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या चार विद्यार्थ्यांची सेल्स असिस्टंट या पदाकरिता निवड करण्यात आली असून त्यांना प्रतिमाह २२ हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे. मुंबई, वडोदरा, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणी विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.