नागपूर विद्यापीठात ‘कॅम्पस प्लेसमेंट सेल’ केवळ नावापुरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 09:51 AM2018-12-18T09:51:53+5:302018-12-18T09:55:52+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच बहुतांश महाविद्यालयात ‘प्लेसमेंट सेल’ हा केवळ नावापुरताच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसून त्यांच्या हातातून रोजगाराची संधी निसटत आहे.
योगेश पांडे / आशिष दुबे / मेघा तिवारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’, रोजगारयुक्त महाराष्ट्र यासारख्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. विद्यापीठ, तांत्रिक संस्था व महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाचा स्तर सुधारावा यावरदेखील भर देण्यास सुुरुवात झाली आहे. मात्र ‘कॅम्पस प्लेसमेंट’संदर्भात अद्यापही विदर्भातील शैक्षणिक संस्थांमध्ये उदासीनता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच बहुतांश महाविद्यालयात ‘प्लेसमेंट सेल’ हा केवळ नावापुरताच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसून त्यांच्या हातातून रोजगाराची संधी निसटत आहे.
३५ वर्षांअगोदर जिल्हा कौशल्य विकास सोसायटी, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून किती तरुणांना रोजगार मिळाला याची आकडेवारीच उपलब्ध नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ५७५ हून अधिक महाविद्यालये असताना त्यातील ११० ठिकाणीच ‘प्लेसमेंट सेल’ आहे. विद्यापीठात दरवर्षाला चार ते साडेचार लाख विद्यार्थी शिकत असतात. यातील ५०-६० हजारांहून अधिक विद्यार्थी अंतिम वर्षाचे असतात. यातील अनेक महाविद्यालयांमधील ‘सेल’ केवळ नावापुरतेच सुरू आहेत.
या ‘प्लेसमेंट सेल’च्या माध्यमातून केवळ ११५०० विद्यार्थ्यांना नेमके मार्गदर्शन मिळू शकते. शिवाय ‘प्लेसमेंट’साठी येणाऱ्या कंपन्यांशी लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेअकरा हजार विद्यार्थीच जोडले जाऊ शकतात. मागील वर्षी विविध कंपन्यांनी घेतलेल्या ‘कॅम्पस’ मुलाखती तसेच महाविद्यालयांमधील ‘प्लेसमेंट सेल’च्या प्रयत्नातून ५२६९ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच थेट रोजगार मिळू शकला. यातही अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीच संख्या जास्त होती. ही आकडेवारी पाहता उर्वरित विद्यार्थ्यांना भविष्याची नेमकी दिशा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.
नागपूर विद्यापीठातील ‘प्लेसमेंट सेल’मध्ये तर ‘कॅम्पस प्लेसमेंट’साठी एकही मोठी कंपनी येत नाही. आठ वर्षांअगोदर एक मोठी कंपनी आली होती व केवळ ‘टेलिकॉलिंग’साठी त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. त्यावेळी विद्यापीठातील आठ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र ‘पॅकेज’ फारच कमी असल्याने निवड झालेल्यांपैकी अनेकांनी नोकरीचे पत्र स्वीकारले नाही. त्यानंतर विद्यापीठात एकदाही ‘कॅम्पस प्लेसमेंट’ झालेले नाही.
‘सॉफ्ट स्कील्स’कडे दुर्लक्ष
विद्यापीठात सर्वात जास्त विद्यार्थी हे कला व वाणिज्य शाखेचे आहेत. त्यानंतर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबाबत न्यूनगंड आहे. मात्र याला दूर करण्यासाठी महाविद्यालय व विद्यापीठाकडून कुठलेही प्रयत्न होत नाहीत. अभ्यासक्रमात ‘सॉफ्ट स्कील्स’शी संबंधित अभ्यासक्रम समाविष्ट करण्याची गरज आहे. मात्र यासाठी कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या कंपन्यांमध्ये जाण्यास धजावत नाही. प्रतिभा असूनदेखील केवळ ‘सॉफ्ट स्कील्स’ नसल्यामुळे विद्यार्थ्यांची रोजगाराची संधी हिरावत आहे.
अधिकाऱ्यांचे केवळ दावेच
तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास सोसायटी, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे नियमित रोजगार मेळावे घेण्यात येतात व १० वर्षात साडेपाच हजारांहून अधिक तरुणांना रोजगार प्राप्त करून दिला असल्याचा दावा सहायक संचालक प्रवीण खंडारे यांनी केला. मात्र त्यांच्याकडे या दाव्यासंदर्भात कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. या मेळाव्यात कुठल्या कंपन्या आल्या होत्या हेदेखील ते सांगू शकले नाहीत.
उच्चशिक्षित चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी तयार
रोजगाराचा अभाव असल्याने उच्चशिक्षित तरुणदेखील चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी तयार आहेत. सरकारी-निमसरकारी कार्यालयांत चतुर्थ श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी उच्चशिक्षितांचे प्रमाण जास्त असते. पोलीस विभागाच्या भरतीप्रक्रियेत बीए, बीकॉम, बीएसस्सी करणाºयांसोबत ‘बीई’, ‘बीटेक’, ‘एमटेक’ व ‘एमबीए’ करणाऱ्यांचीदेखील मोठी संख्या होती.