आज कुणाला सापडेल का महाकवि कालिदास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:18+5:302021-07-11T04:07:18+5:30

- आषाढस्य प्रथम दिवसे : महाकवी कालिदासाच्या स्मरण-विस्मरणाचा काळ प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रज्ञावंतांच्या चिंतन, ...

Can anyone find the great poet Kalidasa today? | आज कुणाला सापडेल का महाकवि कालिदास?

आज कुणाला सापडेल का महाकवि कालिदास?

Next

- आषाढस्य प्रथम दिवसे : महाकवी कालिदासाच्या स्मरण-विस्मरणाचा काळ

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रज्ञावंतांच्या चिंतन, मननातून भारतीय साहित्य संपदा समृद्ध झाली आहे. अगदी अस्तित्त्वात असलेल्या प्राचिन-पौराणिक ग्रंथसंपदेतून हे स्पष्ट होते आणि त्याचे प्रमाण जगाने मान्य केले आहे. कवी कुलगुरू म्हणून ओळख प्रदान करण्यात आलेल्या महाकवि कालिदासाची साहित्य संपदा जगभरासाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. मात्र, आपल्याकडे ही उत्सुकता केवळ डीग्री मिळविण्यासाठीची दिसून येते. तेथेच हा महाकवि हरविल्याचे भासते. तो आज कुणाला सापडेल का? हा संशोधनाचा विषय ठरतो आहे.

प्रेयसी-पत्नी विद्योत्तमेने भ्रमातून एका मुर्खाला विद्वान म्हणून वरमाला घातली. पहिल्याच रात्री तिचा भ्रम तुटला आणि तिच्या तोंडून शब्द निघाले ‘अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः?’ अर्थात तुझ्या वाणीत थोडे तरी विशेष आहे का? आणि तेथून सुरू झाला एका मुर्खाचा विद्वत्तेकडील प्रवास. पुढे अस्ति - कुमारसंभवची सुरुवात, कश्चित्-मेघदूताची सुरुवात आणि वाग् - रघुवंशाची सुरुवात, ही तीन महाकाव्ये त्याच शब्दाच्या प्रारंभाने रचली गेली. कालिदासाच्या अस्तित्त्वाबाबत आजही संशोधन सुरू आहे. सुमारे ३०० वर्षांच्या काळात तो कधीतरी होऊन गेल्याचे सांगितले जाते. मात्र, तो कधी झाला, याबाबत आजही स्पष्टता नाही. विद्योत्तमेने झिडगारल्यामुळे तो रामटेकमध्ये आला आणि पत्नीच्या विरहवेदनेत लिहिलेले यक्षगाणरूपी ‘मेघदूतम्’ हे काव्य फार प्रसिद्ध झाले आणि त्याचे वेड प्रेमात व्यथित झालेल्यांसाठी प्रेमग्रंथ झाले. कलिदासाच्या सर्वच साहित्यकृतींवर नाटके, गायन झाले. मात्र, त्यापलीकडे जाऊन व्हावयाचा विचार अजूनही उजागर झालेला दिसत नाही. मुळात कालिदास म्हणजे तरी कोण, हा विषय केवळ ऐकण्या-बोलण्यापुरताच राहिला आहे. मेघदूतम्मधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीमुळे कालिदासाच्या अस्तित्त्वाला ओळख देण्यासाठी कालिदास दिन म्हणून साजरा होतो, एवढाच तो विषय.

--------

शेख चिल्ली आणि कालिदास

झाडाची जी फांदी कापायची, त्याच फांदीवर तो कुऱ्हाड घेऊन बसला... अशी महामुर्खपणाची दंतकथा आहे. बऱ्याच काळापासून ही कथा महामुर्खपणाचे उदाहरण देण्यासाठी शेख चिल्लीच्या नावाचा वापर केला जात होता. अनेकांच्या अभ्यासातून ही कथा कालिदासाच्या संदर्भातीलच असल्याचे स्पष्ट होते. मात्र, कालिदास म्हणजे मुर्ख हा मुळात मुर्ख नसतो तर तो आपल्या महत्तम प्रयासाने विद्वान होऊ शकतो, ही प्रेरक कथा कधीच अस्तित्त्वात आली नाही. हा दोष कुणाचा?

------------

बाळकडूचे विस्मरण

स्वत्त्वाची जाणीव बळकट करण्यासाठी लहानपणीच बाळकडू देण्याची परंपरा सर्वदेशात, संस्कृतीत आढळून येते. भारतात मात्र, त्या बाळकडूचे विस्मरण झालेले दिसते. त्यामुळेच, कालिदास, भवभूती, अश्वघोष, भास आदी अनेक प्रज्ञावंतांचे हळूहळू विस्मरण झाले. त्याचा परिणाम वयात येईपर्यंत जेव्हा कानावर कालिदास किंवा अन्य कुणाचेही नाव आले तर हा कोण? असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडतो. मोठमोठी काव्यपदे, नाटके हा शालेय अभ्यासाचा विषय नक्कीच नाही. मात्र, या विभूतींसंदर्भातील कथा, दंतकथा आदी शिकविण्यात आल्यास मुले मोठी होईपर्यंत स्वत्त्वाची जाणीव बळकट होईल.

- अजेय गंपावार, मुलाखतकार

----------------

कालिदास केवळ स्मरणापुरताच

कालिदास म्हणा वा अश्वघोष किंवा अन्य कोणतेही प्राचित साहित्यिक आता केवळ नावापुरतेच उरलेले आहेत. काही मोजके लोक त्यांचे स्मरण करतात आणि कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, त्यापुढे जाऊन तो कोण, त्याचे कार्य कोणते, वैशिष्ट्ये कोणती आदींची चर्चा घडतच नाही. माझ्या काही विद्यार्थिनींनी कालिदास हा विषय पीएचडीसाठी घेतला. मात्र, त्यापलीकडे जाऊन कालिदासाच्या कल्पना विशेष का आहेत, त्यातून मिळणाऱ्या प्रेरणा कोणत्या, कलासक्ती काय... यावर कोणीच बोलत नाहीत.

- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी, संस्कृत विद्वान

................

Web Title: Can anyone find the great poet Kalidasa today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.