कॅन्सरचे प्री-डिटेक्शन व 'क्रोमोझोमल रिपेअर' होईल शक्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:57 AM2020-02-09T00:57:18+5:302020-02-09T00:58:56+5:30

भीती वाटणाऱ्या कॅन्सरचे आजारपूर्व निदान आणि हा आजार पुन्हा बळावू देणार नाही, असे रासायनिक मोलिक्यूल नागपूरचे डॉ. राजदीप देवीदास उताणे यांनी संशोधित केले आहे.

Can Cancer Pre-Detection and 'Chromosomal Repair' Be Possible? | कॅन्सरचे प्री-डिटेक्शन व 'क्रोमोझोमल रिपेअर' होईल शक्य?

कॅन्सरचे प्री-डिटेक्शन व 'क्रोमोझोमल रिपेअर' होईल शक्य?

Next
ठळक मुद्देनागपूरचे राजदीप उताणे यांचे पेटेन्टसाठी प्रयत्न : मान्यताप्राप्त संस्थांची मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅन्सर म्हटला की सर्वाधिक जीवघेणा आणि आजही लोकांच्या मनात धडकी भरविणाऱ्यामध्ये गणला जाणारा आजार आहे. लवकर निदान झाल्यानंतर उपचार शक्य असले तरी ही उपचाराची प्रक्रिया अनेकदा रुग्णांना त्रासदायकच असते. शिवाय उपचारानंतरही आजार पुन्हा बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या भीती वाटणाऱ्या कॅन्सरचे आजारपूर्व निदान आणि हा आजार पुन्हा बळावू देणार नाही, असे रासायनिक मोलिक्यूल नागपूरचे डॉ. राजदीप देवीदास उताणे यांनी संशोधित केले आहे. या पद्धतीद्वारे थेट कॅन्सरमुळे डॅमेज झालेल्या क्रोमोझोमचे संपूर्ण रिपेअर करण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला असून या संशोधनाचे पेटेन्ट मिळविण्याचे प्रयत्नही त्यांनी चालविले आहेत.
डॉ. राजदीप उताणे हे रसायनशास्त्राचे अभ्यासक असून नुकतेच त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या प्राध्यापिका डॉ. सुजाता देव यांच्या मार्गदर्शनात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे हे संशोधन त्यांच्या पीएच.डी. अभ्यासाचा विषय होता. ‘ग्रीन अ‍ॅप्रोच टूवर्ड्स सिन्थेसिस ऑफ बॉयोलॉजिकल पोटेन्ट मोलिक्यूल : वन फिलील नॅप्थॅलिन अ‍ॅन्ड देअर डेरिव्हेटीव्ह्ज’ असा हा विषय. संशोधनाला ‘अ‍ॅन्टिजिनोटॉक्सिटी’ असे त्यांनी नाव दिले आहे. यासाठी ‘वन फिनील नॅप्थॅलिन’ हे नवे गुणसूत्र त्यांनी उपयोगात आणले आहे. मायक्रोव्हेव सॉनिकेशन या ग्रीन टेक्निकचा उपयोग करून हे सिन्थेसिस मोलिक्यूल तयार केल्याचे त्यांनी सांगितले. याच मॉलिक्यूलसाठी त्यांनी मुंबईच्या संस्थेत पेटेन्ट मिळविण्यासाठी नोंद केली आहे. या रासायनिक पद्धतीद्वारे कॅन्सरचे पूर्व निदान तर शक्य आहे, मात्र त्यानंतर आजारामुळे नष्ट झालेले क्रोमोझोम पूर्वीच्या क्रोमोझोमप्रमाणेच रिपेअर करण्याची क्षमताही या प्रक्रियेमध्ये असल्याचे सांगत यामुळे उपचारानंतर आजार बळावण्याची शक्यताच बंद होणार, असा दावा डॉ. उताणे यांनी केला आहे. भोपाळच्या पिनॅकल बॉयोमेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे या पद्धतीवर यशस्वी प्रयोग करण्यात आला असून ‘अ‍ॅनिमल इथिकल कमिटी’चीही मान्यता मिळाल्याची माहिती डॉ. उताणे यांनी दिली. हे संशोधन मानवी उपयोगात येण्यासाठी लांब प्रक्रिया पार करावी लागते, मात्र मानवी उपयोगात आल्यास मोठी क्रांती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


प्लास्टिक विलगीकरणाचेही संशोधन
कचऱ्यामध्ये जमा होणारे प्लास्टिक त्यांच्या स्तरानुसार वेगवेगळ्या प्रकारचे असते. जमा कचऱ्यातून त्याचे विलगीकरण करणे ही कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. मात्र डॉ. राजदीप उताणे यांनी यावर ‘फ्लूईड लिक्विड सेपरेशन मेथड’ (एफएलएस मेथड)चा उपाय शोधला आहे. या रासायनिक द्रवाद्वारे हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटी प्लास्टिकचे विलगीकरण सहज आणि कमी वेळात करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही प्रक्रिया १०० टक्के कार्यक्षम असून एका कंपनीत उपयोगातही आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएससीमध्ये चार सुवर्णपदके
डॉ. राजदीप उताणे यांच्यातील कुशाग्र बुद्धिमत्ता आधीच दिसून आली आहे. एम.एस.सी. मध्ये रसायनशास्त्र विषयात त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून चार सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. विशेष म्हणजे नेटच्या परीक्षेतही त्यांनी ऑल इंडिया रॅकिंगमध्ये द्वितीय येण्याचा मान प्राप्त केला. नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नालॉजीच्या पदव्युत्तर पदविकेत त्यांनी विद्यापीठाचे मेरिट प्राप्त केले आहे. सध्या ते संत गाडगेबाबा महाविद्यालय, हिंगणा येथे सहायक प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत.

Web Title: Can Cancer Pre-Detection and 'Chromosomal Repair' Be Possible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.