कालवे ठरताहेत निरुपयोगी

By admin | Published: March 26, 2016 02:51 AM2016-03-26T02:51:05+5:302016-03-26T02:51:05+5:30

गोसेखुर्द आणि आंभोरा उपसा सिंचन योजनेंतर्गत कुही तालुक्यातील पचखेडी शिवारात कालव्याचे बांधकाम करण्यात आले.

Canals are known as useless | कालवे ठरताहेत निरुपयोगी

कालवे ठरताहेत निरुपयोगी

Next

उपसा सिंचन योजना : कोट्यवधींचा खर्च पाण्यात
सुरेश नखाते पचखेडी
गोसेखुर्द आणि आंभोरा उपसा सिंचन योजनेंतर्गत कुही तालुक्यातील पचखेडी शिवारात कालव्याचे बांधकाम करण्यात आले. या कालव्यांच्या निर्मितीवर राज्य शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले. वास्तवात, २५ वर्षांमध्ये या कालव्यांमध्ये बोटावर मोजण्याइतक्यावेळी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना या कालव्यांचा फारसा उपयोग होत नसल्याने ते निरुपयोगी ठरू पाहात आहेत.
कुही तालुक्यात गोसेखुर्द आणि आंभोरा उपसा सिंचन योजनांची निर्मिती करण्यात आली. खरं तर या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या होत्या. या योजनांमार्फत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी १९८४ मध्ये कालव्यांच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली. या कालव्यांचे कामही संथगतीने करण्यात आले.
त्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्यावतीने निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या कालव्यामुळे पचखेडी, जीवनापूर (पुनर्वसन), सोनेगाव (पुनर्वसन), सिर्सी (पुनर्वसन), ब्राम्हणी (पुनर्वसन), मदनापूर, परसोडी, कऱ्हांडला, शिकारपूर, बोथली यासह अन्य शिवारातील शेकडो एकर शेती ओलिताखाली येणार होती. रबीच्या पिकांना पाणी मिळावे, यासाठी कालव्यात पाणी सोडण्याची अनेकदा मागणी केली जाते. परंतु, पाटबंधारे विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दीड महिन्यापूर्वी या कालव्यात एकदा पाणी सोडण्यात आले होते. तेही पुरेसे नव्हते. त्यावेळी पाणी कालव्याच्या टोकावर पोहोचले नव्हते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय, या कालव्यात पाणी सोडणे शक्य नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागातील अधिकारी प्रत्येकवेळी देतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचार केली असता, ते टाळाटाळ करीत वेळ मारून नेतात. त्यामुळे या शिवारात मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना केवळ खरीप पिकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे.

Web Title: Canals are known as useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.