आदिवासींना उद्ध्वस्त करणारे कायदे रद्द करा

By admin | Published: July 24, 2016 02:12 AM2016-07-24T02:12:41+5:302016-07-24T02:12:41+5:30

या देशातील आदिवासींना अस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकटाने अधिक छळले आहे. त्यामुळे त्यांच्या पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त करणारे सरकारी कायदे

Cancel the laws that destroy the tribals | आदिवासींना उद्ध्वस्त करणारे कायदे रद्द करा

आदिवासींना उद्ध्वस्त करणारे कायदे रद्द करा

Next

केंद्रीय मंत्री गडकरी यांचे परखड प्रतिपादन : रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांना ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान
नागपूर : या देशातील आदिवासींना अस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकटाने अधिक छळले आहे. त्यामुळे त्यांच्या पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त करणारे सरकारी कायदे जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही, असे परखड आणि अंतर्मुख करणारे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शनिवारी ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार-२०१६’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. अतिथी म्हणून मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, सामाजिक कार्यकर्त्या रूपाताई कुलकर्णी, सर्वोदयी विचारवंत अ‍ॅड़ मा. म. गडकरी, सी. मो. झाडे फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे व सत्कारमूर्ती डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात ही शारदास्तवनाने करण्यात आली.
गडकरी पुढे म्हणाले, जंगल आणि पर्यावरण टिकलेच पाहिजे. त्यासाठी कायदेही हवेच. मात्र ते कुणासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून आजही अनेक आदिवासी भागात रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, असे सांगितले. शिवाय यामुळे आदिवासींमध्ये प्रचंड आक्रोश असून, यातूनच नक्षलवादासारखी प्रवृत्ती पुढे येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या सर्व सामाजिक व आर्थिक मागासलेल्या लोकांचे जीवन सुसह्य करण्याची गरज आहे. यासाठी आदिवासी भागात उद्योग उभे झाले पाहिजे. वनांवर आधारित रोजगारनिर्मितीतून सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे, असाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सोबतच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मेळघाटातील रस्ते बांधकामादरम्यान त्यांना आलेले कटू अनुभव यावेळी त्यांनी सांगितले. रामटेक क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरपाठोपाठ आता संपूर्ण राज्य दारूमुक्त करावे, अशी मागणी केली.
कार्यक्रमाचे संचालन स्वाती खुद्दार यांनी केले. सी. मो. झाडे फाऊंडेशनचे विश्वस्त नारायण समर्थ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

गडकरींची जनसुनावणी
सत्कारमूर्ती तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्याचा सत्कार करण्याच्या औपचारिकता पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रश्नाबाबत कृतिशील संवेदनशीलता दाखविली. विशेष म्हणजे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी डॉ. कोल्हे दाम्पत्याकडील बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी मेटॅडोरमध्ये भरून चोरून नेल्याची व्यथा त्यांनी शनिवारी गडकरी यांच्यासमोर मांडली. त्यावर गडकरी यांनी लगेच अमरावतीचे पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनी करून घटना सांगितली, तसेच तातडीने आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. शिवाय विद्युत कमी दाबामुळे मेळघाटातील अनेक गावांपर्यंत अजूनही वीज पोहोचली नाही, असेही कोल्हे दाम्पत्याने यावेळी गडकरी यांना सांगितले. त्यावरही गडकरी यांनी तत्काळ मंचावरूनच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दूरध्वनीवरून विषयाची माहिती दिली. त्याच वेळी बावनकुळे यांनीसुद्धा संवेदनशीलता व तत्परता दाखवून लगेच कार्यक्रमस्थळ गाठले आणि मेळघाटातील आदिवासींच्या विजेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

डॉ. कोल्हे दाम्पत्याचा गौरव
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्याला ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार-२०१६’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश, शाल-श्रीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सोबतच यावेळी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित शहरातील उद्योजक तथा सोलर इंडस्ट्रिज इंडिया लि.चे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
जीवाला धोका
यावेळी राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हात दारूबंदी केल्यामुळे आपल्याला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. तसेच राजकारणातून संपविण्याचा जोरदार प्रयत्न झाल्याचे जाहीरपणे सांगितले. सोबतच ते म्हणाले, आज समाज ‘सेल्फी’ काढता काढता ‘सेल्फीश’ व्हायला लागला आहे. यात समाज हा व्यसनमुक्त करण्याची जबाबदारी ही सरकारऐवजी स्वत: समाजाने स्वीकारावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच डॉ. कोल्हे दाम्पत्यासारख्या विचारांचे चांगले लोक गावागावात तयार झाले पाहिजे, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
मेळघाट बदलत आहे
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. रवींद्र कोल्हे यांनी मागील १५ वर्षांत मेळघाट बरेच बदलले आहे. कुपोषण कमी होत आहे, असे सांगितले. मात्र सोबतच अजूनही येथील २५० गावे मोबाईल नेटवर्कच्या बाहेर आहेत. त्यामुळे येथील लोकांना मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा पोहोचव्या लागतील, असे ते म्हणाले. डॉ. स्मिता कोल्हे यांनी डॉक्टर म्हणून आदिवासींमध्ये काम करताना आलेले अनुभव यावेळी कथन केले. त्या म्हणाल्या, एका वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका आदिवासी व्यक्तीवर २०० टाके मारून आपली डॉक्टरी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अनेक आदिवासींचे प्राण वाचविल्याचाही त्यांनी उल्लेख केला

 

Web Title: Cancel the laws that destroy the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.