जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:35+5:302021-06-29T04:07:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, भारतीय जनता पक्षाने पाच जिल्हा परिषदांमधील पोटनिवडणूका रद्द ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, भारतीय जनता पक्षाने पाच जिल्हा परिषदांमधील पोटनिवडणूका रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. ओबीसींवरील अन्याय टाळण्यासाठी तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, या पोटनिवडणुका रद्द करण्यात याव्या, अशी मागणी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यानी जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन पाठविले आहे.
राज्यातील पाच जिल्हा परिषदांमधील ८५ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण संपल्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदांमधील ८५ जागा तसेच पंचायत समित्यांच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. अगोदर ओबीसींसाठी राखीव असणाऱ्या या जागांवर ओबीसी उमेदवारांना सर्वसाधारण प्रवर्गातून लढावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रक्रिया पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत सर्वसाधारण गटातून निवडणूक घेणे ओबीसींवर अन्यायकारक ठरेल. त्यामुळे या निवडणुका रद्द कराव्यात, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो
भाजप नेत्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुद्दादेखील उपस्थित केला आहे. सध्या राज्यात कोरोनाची दुसरी कमी होती तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. अशास्थितीत पाच जिल्हा परिषदा व त्यांच्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या काही जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविणे अत्यंत धोकादायक आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात प्रचारामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क येणे स्वाभाविक आहे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य आहे. निवडणुकीमुळे कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.