रद्द करण्यात आलेली ईतवारी टाटानगर एक्सप्रेस बुधवारी, १७ जुलैला धावणार!
By नरेश डोंगरे | Updated: July 16, 2024 20:09 IST2024-07-16T20:08:31+5:302024-07-16T20:09:02+5:30
नेहमीच्या वेळेनुसार ही ट्रेन धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे

रद्द करण्यात आलेली ईतवारी टाटानगर एक्सप्रेस बुधवारी, १७ जुलैला धावणार!
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विकास कामांचा हवाला देऊन यापूर्वी रद्द करण्यात आलेली नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी - टाटानगर एक्सप्रेस आज १७ जुलै २०२४ ला तिच्या नेहमीच्या वेळेनुसार धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या अकलतरा-नैला सेक्शनमध्ये साईडिंग कनेक्टीव्हीटी आणि ऑटो सिग्नलिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी स्टेशनवरून धावणारी ट्रेन नंबर १८११० टाटानगर एक्सप्रेस १७ जुलैला रद्द करण्यात आली होती. तशी सूचना दपूम रेल्वे प्रशासनाने जाहिर केली होती. मात्र, आज मंगळवारी हा निर्णय फिरविण्यात आला. ही गाडी तिच्या नियमित वेळेनुसार ईतवारी रेल्वे स्थानकावरून बुधवारी १७ जुलैला सुटणार आणि पुढचा प्रवास पूर्ण करणार असल्याचे कळविले आहे.
दरम्यान, दपूम रेल्वे प्रशासनाने आधी कळविल्यानुसार, या गाडीने प्रवासाचा बेत आखलेल्या शेकडो प्रवाशांनी काढलेली तिकिटं रद्द करून प्रवासाचे नियोजन बदलविले होते. आता ही रद्द करण्यात आलेली गाडी प्रवाशांना सेवा देणार असल्याचे कळविल्यामुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे.