जन्मठेप रद्द करून सात वर्षे कारावास
By Admin | Published: March 26, 2016 02:54 AM2016-03-26T02:54:30+5:302016-03-26T02:54:30+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवनमधील एका हत्याप्रकरणात आरोपीला जन्मठेप रद्द करून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
हायकोर्ट : नंदनवनमधील हत्याप्रकरण
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवनमधील एका हत्याप्रकरणात आरोपीला जन्मठेप रद्द करून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अतुल केवलराम शेंडे (३२) असे आरोपीचे नाव असून तो नंदनवन झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. २३ मे २०१३ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील अंशत: मंजूर केले व त्याला कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मृताचे नाव राहुल नागदिवे होते. १ आॅगस्ट २०११ रोजी आरोपी अतुल व त्याच्या भावाने जुने भांडण उकरून काढून राहुलला मारहाण केली. दरम्यान, आरोपीने राहुलवर चाकूसारख्या शस्त्राने वार केला. परिणामी राहुल ठार झाला. नंदनवन पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरीपीतर्फे अॅड. राजेंद्र डागा तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)