शिक्षकाविरुद्धचा विनयभंगाचा गुन्हा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:24+5:302021-09-06T04:11:24+5:30
नागपूर : लैंगिक हेतू सिद्ध करणाऱ्या पुराव्यांच्या अभावामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षक प्रणब मंडल ...
नागपूर : लैंगिक हेतू सिद्ध करणाऱ्या पुराव्यांच्या अभावामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षक प्रणब मंडल यांच्याविरुद्धचा विनयभंगाचा गुन्हा रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
दि. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी मंडल यांनी एका विद्यार्थिनीला दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. विद्यार्थिनीने दुचाकीवर बसल्यानंतर स्वत:पुढे बॅग ठेवली होती. शाळा परिसर ओलांडताच मंडल यांनी तिला मधे ठेवलेली बॅग पुढे देण्यास सांगितले. पहिल्यांदा मुलीने बॅग देण्यास नकार दिला. परंतु, मंडल यांनी आग्रह केल्यानंतर विद्यार्थिनीने त्यांना बॅग दिली. दरम्यान, मंडल यांनी तिचा हात पकडला अशी पोलीस तक्रार होती. तसेच, विद्यार्थिनीने तिच्या जबाबामध्ये यापुढे काहीच घडले नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाने हा जबाब लक्षात घेता, विनयभंगाचा गुन्हा लागू होण्यासाठी आवश्यक असलेल्या लैंगिक हेतूसह इतर बाबी या प्रकरणात नाहीत, असा निष्कर्ष नोंदवून मंडल यांच्याविरुद्धचा गुन्हा रद्द केला.