समृद्धी महामार्गावर टोल वसूल करणाऱ्या एजन्सीचा ठेका रद्द, सुविधांची वानवा

By नरेश डोंगरे | Published: September 23, 2024 11:42 PM2024-09-23T23:42:36+5:302024-09-23T23:43:01+5:30

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल करण्याचा ठेका या कंपनीला ११ डिसेंबर २०२२ ला देण्यात आला होता.

Cancellation of contract of toll collecting agency on samruddhi highway, loss of facilities | समृद्धी महामार्गावर टोल वसूल करणाऱ्या एजन्सीचा ठेका रद्द, सुविधांची वानवा

समृद्धी महामार्गावर टोल वसूल करणाऱ्या एजन्सीचा ठेका रद्द, सुविधांची वानवा

नागपूर : मोठ्या रकमेचा टोल वसूल करणाऱ्या मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांकडे तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या रोडवेज सॉल्यूशन्स कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ही कारवाई केली. एवढेच नव्हे तर हे काम करण्यासाठी निविदाही काढण्यात आली असून २६ सप्टेंबरला ती उघडली जाणार आहे.

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल करण्याचा ठेका या कंपनीला ११ डिसेंबर २०२२ ला देण्यात आला होता. तो आता रद्द करण्यात आल्याने या कंपनीची भागीदार असलेल्या 'फास्टगो'चे टेंडरही टर्मिनेट करण्यात आल्याचे समजते. एकीकडे महामार्गाचा वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात उपयोग वाढत असताना टोल प्लाझावर आवश्यक असलेल्या सुविधांचा ग्राफ सारखा खाली येत होता. 

त्यामुळे वाहनधारक, नागरिकांकडून ओरड होत होती. दुसरीकडे टोल प्लाझावर काम करणारे सुमारे २८०० कर्मचारीदेखील त्रस्त झाले होते. त्यांना वेळेवर वेतन मिळत नव्हते. एमएसआरडीसीने आता जी नवीन निविदा मागविली त्यात केवळ तीन महिन्यांसाठीच टेंडर दिले जाणार असल्याचे समजते.

पन्नासावर तक्रारी
एमएसआरडीसीच्या सूत्रांनुसार, टोल कलेक्शन करणाऱ्या या एजन्सीविरुद्ध ५० पेक्षा जास्त तक्रारी एमएसआरडीसीकडे आल्या होत्या. तक्रारीत शौचालयाचा अभाव, तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा नसणे, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न देणे, त्यांचा पीएफ जमा न करणे, ईएसआयसी कार्ड न बनविणे आदींचा त्यात समावेश होता. लोकमतने या संबंधाने वृत्तही प्रकाशित केले होते.

वर्षभरात ६९ नोटीस देण्यात आल्या 
सूत्रांनुसार, या कंपनीला गेल्या वर्षभरात ६९ नोटीस देण्यात आल्या होत्या. मात्र त्याला दाद मिळत नव्हती. त्यामुळे अंतिम नोटीस १६ सप्टेंबरला बजावण्यात आली होती. मात्र, कसलीही सुधारणा होत नसल्याचे पाहून अखेर या कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला.

Web Title: Cancellation of contract of toll collecting agency on samruddhi highway, loss of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.