कॅन्सरबाधित हाड काढले, रेडिएशन देऊन पुन्हा जोडले ! अपंगत्व टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 11:07 AM2022-07-23T11:07:58+5:302022-07-23T11:13:06+5:30
त्या तरुण मुलीला ‘ऑस्टिओसारकोमा’ आजार होता. हा हाडांच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : मांडीच्या हाडाजवळ कॅन्सरची गाठ होती. तेवढे हाड कापून कृत्रिम हाड बसविणे गरजेचे होते; परंतु त्यासाठी लागणाऱ्या १० लाख रुपयांची त्या गरीब कुटुंबाची परिस्थिती नव्हती. कॅन्सर पसरू नये म्हणून पाय कापण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट तज्ज्ञ व ज्येष्ठ ऑर्थाेपेडिक सर्जन यांनी एक वेगळा प्रयोग केला आणि १८ वर्षीय मुलीचे पाय कापणे टळले. तिला आजीवन अंपगत्वातून वाचविले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक व रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. करतार सिंग व ज्येष्ठ ऑर्थाेपेडिक सर्जन डॉ. अनिल गोल्हर असे त्या डॉक्टरांचे नाव. डॉ. सिंग यांनी सांगितले, १८ वर्षीय मुलीच्या मांडीच्या हाडाजवळ कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाल्यावर तिच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये किमोथेरपी दिली जात होती. हे थेरपी दिल्यावर पुढील उपचार म्हणजे कॅन्सरबाधित हाड काढून टाकून त्या ठिकाणी कृत्रिम हाड बसविणे होते. त्यासाठी जवळपास १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता; परंतु एवढा पैसा उभा करणे कुटुंबासाठी कठीण होते. यामुळे पाय कापणे हाच पर्याय होता. याविषयी डॉ. अनिल गोल्हर यांच्याशी चर्चा केली. पाय वाचविण्यासाठी नवा प्रयोग करण्यावर एकमत झाले.
-रेडिएशन देऊन पुन्हा हाड जोडले
डॉ. गोल्हर यांनी मुलीचा कॅन्सरग्रस्त असलेले पायाचे हाड कापले. डॉ. करतार सिंग यांनी कापलेले हाडावर कोबाल्ट थेरपीच्या मदतीने रेडिएशन देऊन निर्जंतुकीकरण आणि कर्करोगमुक्त केले. त्यानंतर डॉ. गोल्हर यांनी ते हाड पुन्हा रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले. गुरुवारी त्या मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पाय वाचल्याचा आनंद त्या मुलीसह तिच्या कुटुंबाचा चेहऱ्यावर होता.
- त्या मुलीला ‘ऑस्टिओसारकोमा’ आजार
त्या तरुण मुलीला ‘ऑस्टिओसारकोमा’ आजार होता. हा हाडांच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. जो हाडे तयार करणाऱ्या पेशींमध्ये असतो. यावरील वेगळ्या उपचारामुळे पाय कापणे टळले. आता तिला कोणत्याही आधाराशिवाय स्वत:च्या पायावर चालता येणार आहे. तिला गुडघे वाकवता येणार नसले तरी उभे राहणे आणि चालणे हे मोठे वरदान ठरणार आहे.
-हाडावर ‘५० जीआरवाय युनिट’ रेडिएशन
डॉ. सिंग म्हणाले, काढलेल्या हाडावर एकाच बैठकीत ‘५० जीआरवाय युनिट’ रेडिएशन देऊन ते हाड कॅन्सरमुक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये याचा खर्चही कमी आल्याने त्या गरीब कुटुंबाला मदत झाली. हाडांच्या कर्करोगावर कोबाल्ट थेरपी युनिटच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात आणि पाय कापून टाकणे टाळता येऊ शकते, हे यातून पुढे आले आहे.