कॅन्सर हॉस्पिटलला मिळणार ४५ कोटी
By admin | Published: August 7, 2016 02:05 AM2016-08-07T02:05:22+5:302016-08-07T02:05:22+5:30
देशात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. याला गंभीरतेने घेत राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने....
नितीन गडकरी : राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यशाळेचे उद्घाटन
नागपूर : देशात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. याला गंभीरतेने घेत राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने ४५ कोटी रुपयाला मंजुरी दिली आहे. यातील ३० कोटी रुपये हे उपकरणांवर तर १५ कोटी रुपये बांधकामावर खर्च केले जाणार आहे. याचा फायदा तळागळातील रुग्णांना व्हावा, हीच अपेक्षा आहे, असे मत, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने आयोजित दोन दिवसीय कॅन्सर विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेच्या शनिवारी उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, आ. सुधाकर कोहळे, आ. मिलिंद माने, एम्सच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य अधिकारी डॉ. जी. के. रठ, प्रसिद्ध कॅन्सर रोग विशेषज्ञ आणि आन्कोलॉजी अॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. पूरविश पारिख, कॅन्सर रिलीफ सोसायटीचे उपाध्यक्ष बसंतलाल शॉ, सचिव अशोक क्रिपलानी, डॉ. अमित भट आदी उपस्थित होते.
कॅन्सरचे वेळीच निदान झाल्यास तो ७० टक्के बरा होऊ शकतो. म्हणूनच महाआरोग्य शिबिरातून विशेषत: महिलांच्या तपासणीवर भर दिला जात आहे. कॅन्सर हॉस्पिटलने स्वत:चा विकास साधत संशोधनातही प्रगती करावी व राज्यातच नव्हे तर देशात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन करीत गडकरी यांनी स्वत:च्या खात्याकडून उपकरण खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही दिली.