उपचार कार्य विस्तारण्याचा कॅन्सर रुग्णालयाचा प्रयत्न
By admin | Published: August 3, 2016 02:44 AM2016-08-03T02:44:17+5:302016-08-03T02:44:17+5:30
तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात असलेल्या भारतासारख्या देशात कर्करुग्णांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
तालुका रुग्णालयांच्या डॉक्टर, नर्सेसना देणार प्रशिक्षण
नागपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात असलेल्या भारतासारख्या देशात कर्करुग्णांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. या आजाराशी लढा देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री मात्र उपलब्ध नाही. साधन सामाग्रीने परिपूर्ण होण्यासाठी आणखी बरीच वर्षे वाट पहावी लागणार आहे. अशावेळी असलेल्या साधनात उपचार कार्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व संशोधन केंद्रातर्फे केला जात आहे. यासाठी तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कॅन्सरबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रुग्णालयाचे संचालक डॉ. पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना उपचाराच्या साधनांबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणखी २० ते २५ वर्षे लागण्याची शक्यता आहे. देशात कॅन्सरमुळे मृतांची संख्याही जगात सर्वात जास्त आहे. याचे कारण लोकांमध्ये असलेला जनजागृतीचा अभाव. विशेष म्हणजे प्राथमिक स्तरावर कॅन्सरचे डिटेक्शन झाल्यास हा आजार सहज बरा होऊ शकतो. मात्र कुठली लक्षणे आढळल्यास कॅन्सरचे निदान करावे याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक रुग्ण शेवटच्या स्तरावर मान्यताप्राप्त रुग्णालयात धाव घेतात. त्यामुळे साधन उपलब्ध नसले तरी सेवा मात्र ग्रामीण स्तरापर्यंत पोहचविली जाऊ शकते, असा विश्वास डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला. याअंतर्गत राज्य शासनाच्या मदतीने येत्या ६ व ७ आॅगस्ट रोजी कॅन्सर रुग्णालयात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. नवीन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मुख, स्तन, गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण ७० टक्के आहे. याअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व लॅब टेक्निशियन यांना कॅन्सर तज्ज्ञांकडून प्राथमिक तपासणीचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरुन प्राथमिक लक्षणे आढळल्यास ग्रामीण स्तरावरील डॉक्टर संबंधित रुग्णाला थेट कॅन्सर रुग्णालयात पाठवू शकतील.
येत्या ६ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता या कॅन्सर विज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे उद््घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके आदी उपस्थित राहतील.
पत्रपरिषदेला कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक क्रिपलानी, कोषाध्यक्ष अवतराम चावला, सहसचिव डॉ. आर.के. छांगाणी, महेश साधवानी, सुरेश केवलरमानी, सहसंचालक डॉ.बी.के. शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवीप्रसाद सेनगुप्ता, प्रशासकीय अधिकारी शाहिद अली आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कॅन्सर रुग्णालयात ६ ला प्रशिक्षण
या कार्यक्रमांतर्गत ६ आॅगस्ट रोजी तालुका रुग्णालय व आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तर ७ आॅगस्ट रोजी आयएमएच्या डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे डॉ. बी.के. शर्मा यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेत एम्सचे डॉ.जी.के. रथ, एशियन इन्स्टिट्यूट आॅफ आॅन्कोलॉजी मुंबईचे डॉ. पूर्वीश पारीख, डॉ. अमित भट, डॉ. सचिन हिंगमिरे, डॉ.ए. ए. रानडे आदी कॅन्सर तज्ज्ञ तांत्रिक प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.